LIC मध्ये पुन्हा हिस्सेदारी विकण्याची सरकारची तयारी; शेअरमध्ये तेजी, आता काय आहे भाव
LIC Stake : केंद्र सरकार या आर्थिक वर्षात एलआयसीमधील 5 टक्के हिस्सेदारी विक्री करण्याची योजना तयार करत आहे. सेबीच्या नियामानुसार, सूचीबद्ध कंपन्यांमध्ये कमीत कमी 25 टक्के सार्वजनिक शेअरहोल्डिंग असणे आवश्यक आहे.
सरकार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये या आर्थिक वर्षात 5 टक्क्यांची हिस्सेदारी विक्री करण्याची योजना तयार करत आहे. केंद्र सरकार मे 2022 मध्ये या कंपनीचा आयपीओ घेऊन आली होती. त्यामाध्यमातून सरकारने 21,000 कोटी रुपये जमवले होते. या आयपीओ अंतर्गत सरकारने कंपनीतील 3.5 कोटींची हिस्सेदारी विक्री केली होती.
कंपनीत आता सरकारची 96.5 टक्के हिस्सेदारी आहे. हिंदू बिझनेसलाईनने सूत्रांच्या आधारे दिलेल्या एका वृत्तानुसार, सरकार एलआयसीतील हिस्सेदारी कमी करण्यासाठी लवकरच एफपीओ आणि क्यूआयपी आणण्याच्या विचारात आहे. कंपनीचा शेअर सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 3% टक्क्यांहून अधिकने उसळला. हा शेअर आता दुपारी तीन वाजता 1121.65 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 7,03,497.87 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
SEBI चा नियम काय
सेबीच्या नियमानुसार, प्रत्येक सूचीबद्ध कंपनीत कमीत कमी 25 टक्के वाटा हा सार्वजनिक असायला हवा. सरकारने गेल्या वर्षी ही अट पूर्ण करण्यासाठी 10 वर्षांची सवलत घेतली होती. कंपनीला मे 2032 पर्यंत 25 टक्के वाटा सार्वजनिक करावा लागणार आहे. सेबीने या वर्षी 14 मे रोजी एलआयसीला 10 टक्के पब्लिक शेअरहोल्डिंगची अट पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा अतिरिक्त वेळ दिला होता. त्यामुळे एलआयसीचा शेअर सूचीबद्ध करण्याच्या पाच वर्षांतच म्हणजे 16 मे 2027 रोजीपर्यंत हे काम करावे लागणार आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. प्रीमियमनुसार तिचा बाजारातील वाटा 58.87 टक्के तर विमा पॉलिसीजनुसार हा वाटा 69.91 टक्के इतका आहे.
एलआयसीचा आयपीओ
एलआयसीचा 21,000 कोटींचा आयपीओ मे 2022 मध्ये आला होता. हा भारतीय इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे. एलआयसीच्या आयपीओची इश्यू प्राईस 949 रुपये होती. हा शेअर 17 मे, 2022 रोजी सूचीबद्ध झाला होता. एलआयसीचा 52 आठवड्यातील उच्चांक1,221.50 रुपये होता. तर निच्चांक 597.65 रुपये होता. गेल्या सत्रात हा शेअर 1079.20 रुपयांवर बंद झाला होता. आज हा शेअर 1116.55 रुपयांवर उघडला. व्यापारी सत्रात हा शेअर तीन टक्क्यांहून अधिक तेजीसह 1116.95 रुपयांपर्यंत पोहचला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.