Health Insurance : आरोग्य विमासंदर्भात कंपन्यांच्या ‘शाळे’ला चपराक, केंद्र सरकारने केला हा उपाय, आता थेट करा अशी तक्रार..
Health Insurance : आरोग्य विमासंदर्भात आता तुम्हाला सहज तक्रार करता येईल..
नवी दिल्ली : कोरोना महामारीत (coronavirus pandemic) मोठ्या प्रमाणात आरोग्य विमा संदर्भात (Health Insurance) कमालीची जागरुकता वाढली. विमा कंपन्या तिच्या ग्राहकांना आकर्षक ऑफर देऊन पॉलिसींची विक्री करत आहेत. परंतु, घाईघाईत पॉलिसीशी संबंधित माहिती ग्राहक नेहमी दुर्लक्ष करतो. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स खरेदीपूर्वी योग्य विचार करुन आणि सल्ला मसलतीनंतर विमा खरेदी करावा. तुमच्या गरजेनुसार आणि विमा प्रतिनिधीच्या मदतीने विमा खरेदी करा. पण भूलथापा मारुन पॉलिसी माथी मारली असेल तर तुम्हाला त्याविषयी आता तक्रार करता येणार आहे.
अनेकदा आकर्षक ऑफरच्या नावाखाली फसवणूक करण्यात येते. आरोग्य विम्याचा (insurance policy) दावा दाखल करताना कंपन्या तो मंजूर करत नाही. अनेकदा आश्वासन दिलेल्या वेळी गोष्टी वेळेवर नाकारण्यात येतात. त्यामुळे तुम्हाला खिशातून रक्कम भरावी लागते अशावेळी तुम्हाला तक्रार दाखल करता येते.
सगळ्या विमा कंपन्यांकडे तक्रार दाखल करण्यासाठी हेल्प डेस्क असतो. त्याठिकाणी तक्रारीचा आढावा घेण्यासाठी अधिकारी असतो. हा अधिकारी तक्रारींचा निपटारा करतो. कस्टमर केअरची सेवा ही असते. तुम्ही तक्रार दाखल करण्यासाठी विमा कंपनीच्या जवळच्या शाखेत (Nearest Insurance Company Branch) जाऊ शकतात.
पण अनेकदा विमा कंपनीच्या धोरणावर आपण नाखूष असतो. विमा कंपनीने फसवणूक केल्याची भावना मनात घर करुन असते. त्यामुळे विमा कंपनीच्या मदतीवर आपण अवलंबून नसतो. अशा परिस्थितीत आता विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) खास हेल्प डेस्क तयार केला आहे.
कंपनीच्या धोरणावर तुम्ही नाखूष असाल तर तुम्हाला complaints@irdai.gov.in या मेल आयडीवर तक्रार दाखल करता येईल. तसेच टोल फ्री (IRDA Toll Free Number) 155255/1800 425 4732 या क्रमांकावर कॉल करुन तक्रार दाखल करता येईल.