इस्रायल-हमास युद्धामुळे हॉटेलातील जेवण महागणार, हे आहे कारण
इस्रायल-हमास युद्धाचे चटके हळूहळू आपल्या रोजच्या जगण्याला बसू लागले आहेत. हे युद्ध अधिक लांबले तर अनेक वस्तू महाग होऊ शकतील. त्यामुळे या युद्धाचा थेट आपल्या जीवनावर परिमाण होणार आहे.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : इस्रायल आणि हमासचा युद्धाचा परिणाम तुमच्या खिशावर देखील होणार आहे. खास करून तुमच्या हॉटेलिंग आणि रेस्टॉरंटचे खाण्यापिण्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही विचार करीत असाल इस्रायल युद्धाचा याच्याशी काय संबंध ? इस्रायल आणि हमास युद्धानंतर कच्च्या तेलाच्या भावात उसळी आली आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानंतर लागलीच तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅसचे भाव वाढविले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात थेट 101 रुपयांची भाववाढ झाली आहे. या दरवाढीनंतर चेन्नई सारख्या शहरात तर गॅस सिलिंडरचे भाव 2000 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
कमर्शियल गॅस सिलिंडरचे भावाचे दर वाढल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. कारण कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरचा सर्वाधिक वापर हॉटेलात केला जातो. त्यामुळे आता याची भरपाई हॉटेल मालक आता ग्राहकांकडून अन्नपदार्थांची दरवाढ करून करणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरची भाववाढ झाली आहे.
दिल्लीच्या अशोकनगरातील हॉटेल मालक रमेश मिश्र यांच्या मते सरकारने दोनवेळा गॅसची दरवाढ केली आहे. आम्हाला त्याचा थेट फटका बसणार आहे. आम्ही झोमॅटो आणि अन्य फूड डिलिव्हरी चेनलाही जेवण पुरवितो. दिल्लीबाहेर नोएडापर्यंत जेवण पुरविले जाते. एक दिवसातच 3 ते 4 सिलिंडर खर्च करावे लागतात. गेल्या दोन महिन्यात गॅसचे दर 310 रुपये वाढले आहे. त्यामुळे आमचा खर्च वाढला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विविध भागातील गॅस सिलींडरचे दर
दिल्लीत कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. चेन्नईत 1999 रुपयांच्या पार पोहचली आहे. दिवाळी गॅसचा वापर जास्त होतो. सरकारने 19 किलो गॅस सिलिंडरचे दरवाढ केली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देखील भाव वाढले होते. दिल्लीत कमर्शियल गॅस किंमत 310.50 रु.वाढली. तर कोलकातात 307 रु. तर मुंबईत 303.50 रु. आणि चेन्नईत 304.50 रु. दर वाढले होते.
घरगुती सिलिंडरमध्ये वाढ नाही
सरकार दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करते. सुदैवाने यंदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली नाही. या आधी घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. आता दिल्लीत 14.2 किलोग्रॅम गॅस सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे. तर मुंबईत सबसिडी नसलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर 902.50 रु. आहे. तर कमर्शियल गॅस सिलिंडरचा दर 101.50 रुपयांनी वाढून 1,785 रुपये झाला आहे.