Indian Rupees : परदेशी चलनासमोर लागतो का भारतीय रुपयाचा निभाव, कुठे खातो भाव
Indian Rupees : परदेशी चलनासमोर भारतीय रुपया आता शड्डू ठोकत आहे. दम दाखवत आहे, पण जागतिक बाजारात रुपयाची किंमत किती आहे, माहिती आहे का?
नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : भारतीय रुपया (Indian Rupees ) सध्या छाती फुगवून जागतिक बाजारात मांड ठोकत आहे. युपीआय पेमेंट आणि डिजिटल रुपयाच्या माध्यमातून डॉलरला टक्कर देण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भारतीय रुपयात बळ भरण्यात येत आहे. पण जागतिक बाजारात भारतीय रुपयाची किंमत किती आहे? त्याचे मूल्य किती आहे? हे माहिती आहे का. अनेकांना डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया किती घसरला याची चिंता सतावत असते. कारण जागतिक व्यवहार डॉलरमध्येच होतात. पण इतर देशांच्या चलनाच्या (Foreign Currency) तुलनेत आपला रुपया कुठे आहे, त्याचा कोणत्या चलनासमोर लवकर निभाव लागत नाही आणि कुठे तो भाव खातो हे माहिती आहे का?
कोणते चलन मजबूत?
जागतिक बाजारात प्रत्येक देशाचे चलन आहे. प्रत्येक देशात त्याचे चलन चालते. काही चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन देशांमध्ये व्यवहारासाठी वापरतात. कोणत्या देशाचे चलन मजबूत आहे आणि कोणत्या देशाचे चलन कमकूवत हे विनिमय दरामुळे (Exchange Rate) समजते.
फ्लोटिंग एक्सचेंज रेट
युएस डॉलर हे जगातील मजबूत चलन आहे. दोन देशात याच चलनाआधारे वस्तू विनिमय होतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय दर 82.95 आहे. म्हणजे एका डॉलरसाठी 82.95 भारतीय रुपये मोजावे लागतात. 1990 पूर्वी आरबीआय एक्सचेंज रेट निश्चित करत होती. हा निश्चित विनिमय दर होता. त्यामुळे नुकसान होत होते. आता भारताने फ्लोटिंग एक्सचेंज रेट स्वीकारला आहे.
विनिमय दर यादी प्रसिद्ध
केंद्रीय अर्थमंत्रालयाने भारतीय चलनाचे इतर देशाच्या चलनाशीसंबंधित विनिमय दर जाहीर केला आहे. आयात आणि निर्यातीसाठी हा आकडा वेगवेगळा आहे. त्यानुसार, परदेशाशी व्यापार करण्यात येतो.
काय आहे भाव
आयात मालासाठी ऑस्ट्रेलियन डॉलरचा विनिमय दर 57.35 इतका आहे. बहरीन दिनारसाठी एक्सचेंट रेट 224.55 इतका आहे. म्हणजे एका दिनारसाठी 224.55 रुपये मोजावे लागतात. कॅनेडियन डॉलर 63.50, चीनच्या युआन चलनासाठी 11.60, युरोसाठी 93.75 आणि कतारच्या रियालसाठी 23.25 रुपये मोजावे लागतात.
तुर्कीच्या चलनासाठी मात्र इतके रुपये
अमेरिकन डॉलरसाठी 82.95 रुपये, हाँगकाँग डॉलरसाठी 10.70, संयुक्त अमिर अमिरातच्या दिरहमसाठी 23.05, स्विस फ्रँकसाठी 97.70, स्वीडिश क्रोनरसाठी 8.15, दक्षिण आफ्रिकेच्या रँडची 4.75, सिंगापुर डॉलर 63.10 तर तुर्की लीरासाठी 3.15 रुपये खर्च होतात.
एक्सचेंज रेट म्हणजे काय
विनिमय दर अनेक घटकांवर आधारीत आहे. महागाई, व्याजदर, खेळते भांडवल, भांडवल तरलता आणि चालू खात्याचा एक्सचेंज रेटला प्रभावित करतो. तसेच मागणी आणि पुरवठा हा पण मोठा घटक आहे. जागतिक बाजारात मागणी वाढली की डॉलर महाग होतो. यालाच फ्लोटिंग एक्सचेंज रेट (Floating Exchange Rate) म्हणतात.