पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol and diesel price) गगनाला भिडले आहेत. गेल्या 22 मार्चपासून ते आतापर्यंत इंधनाच्या दरात लिटर मागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल महागल्याने वाहतूक खर्चात देखील वाढ झाल्याने सर्वच गोष्टींचे भाव वाढले आहेत. दरम्यान आता इंधनाचे दर नियंत्रणात आणले जावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय पेट्रोलीयम मंत्री (petroleum minister) हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत, त्यामुळे कंपन्यांवर दबाव निर्माण झाला आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सहा एप्रिल नंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. मात्र कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर जर आणखी वाढले तर इंधनाच्या दरावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. इंधनाचे दर नियंत्रित ठेवायचे असल्यास त्याला एकमेव उपाय म्हणजे राज्य सरकारने आपल्या राज्यात इंधनावर आकारण्यात येणारा व्हॅट कमी करावा. ते छत्तीसगड दौऱ्यावर असताना बोलत होते.
वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना पुरी यांनी म्हटले की, सरकारकडून इंधनाच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी इंधनावर आकारण्यात येणाऱ्या एक्साइज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारने देखील सहकार्य करावं. राज्य सरकारने आपल्या राज्यातील इंधनावरील व्हॅट कमी केल्यास इंधनाच्या दरात घसरण होऊ शकते. छत्तीसगडमध्ये इंधनावर 24 टक्के व्हॅट आकारण्यात येतो. त्यामध्ये घट करून तो जर दहा टक्क्यांवर आणला तर आपोआपच इंधनाचे दर कमी होतील.
पुढे बोलताना पुरी यांनी म्हटले की, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा फटका कच्च्या तेल आयातीला बसला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा दबाव हा पेट्रोलियम कंपन्यावर निर्माण होत आहे. जर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ केल्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. मात्र राज्यांनी व्हॅट कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा.
विमा पॉलिसी खरेदी करून फसला आहात; नको असलेल्या पॉलिसीमधून अशी करा आपली सुटका
‘कोटक महिंद्रा बँके’ची ग्राहकांसाठी भेट, आता FD वर पूर्वीपेक्षा मिळेल जास्त नफा !