दैनंदिन गरजेच्या वस्तुंच्या किंमती लावणार जीवाला घोर ! एफएमसीजीची उत्पादने होणार अधिक महाग, हिंदुस्तान युनिलिव्हरचे सीईओ संजीव मेहता यांचे संकेत
हिंदुस्थान युनिलिव्हरचे सीईओ संजीव मेहता यांनी सांगितले की, पामतेल आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एफएमसीजी उत्पादनांच्या किमती त अजूनही आणखी वाढ घेईल. जोपर्यंत वस्तूंच्या किंमती कमी होत नाहीत, तोपर्यंत महागाईचा दबाव कायम राहील.
नवी दिल्लीः दैनंदिन गरजेच्या वस्तुंच्या किंमती सर्वसामान्यांच्या जीवाला घोर लावतील. महागाईने मेटाकुटीला आलेला सर्वसामान्य माणूस या दैनंदिन खर्चाने जेरीस येईल. हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मेहता (HUL CEO Sanjeev Mehta) यांनी सांगितले की, ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG Products) उद्योगांना येत्या काळात आणखी महागाईच्या झळा बसतील आणि जीवनावश्यक वस्तू महाग होतील. मनी कंट्रोलशी (Money Control) संवाद साधताना मेहता म्हणाले की, जोपर्यत कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ होत राहिल तोपर्यंत महागाईचा दबाव कायम राहील. ते म्हणाले की, पाम तेल आणि कच्च्या तेलातील (Crude oil) तेजीचा महागाईवर खूप वाईट परिणाम होत आहे. महागाईमुळे कंपन्यांच्या मार्जिनवरही परिणाम होत आहे. पाम तेलाचा वापर एफएमसीजी उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जातो. डिओडोरंट, शाम्पू, टूथपेस्ट, लिपस्टिक, चॉकलेट, अॅनिमल फीडपासून जैवइंधनापर्यंत डझनभर उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो. जगातील सर्वात मोठा पाम तेल निर्यातदार इंडोनेशियाने निर्यातीवरील (Indonesia Export Ban) बंदी घातली आहे. परिणामी ग्राहकोपयोगी किंमतीत वाढ सुरुच राहील.
कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने एफएमसीजी कंपन्या महागाईने त्रस्त आहेत. त्यामुळे एफएमसीजी कंपन्यांचे मार्जिनही कमी झाले आहे. चौथ्या तिमाहीत हिंदुस्थान युनिलिव्हरच्या ग्रॉस मार्जिनमध्ये 3.31 टक्क्यांनी घट झाली आहे. मेहता म्हणाले की, सर्वात मोठा परिणाम टॉयलेट साबण, सर्फ यासारख्या शुद्धीकरण उत्पादनांवर झाला आहे. पामतेलाच्या किंमत वाढीचा या सेगमेंटवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. टॉयलेट साबणाच्या किंमतीतील वाढ पामतेलाच्या किंमतीतील तेजीमुळे आणि सर्फच्या किंमतीत झालेली वाढ कच्च्या तेलाच्या किंमतीतील तेजीमुळे आहे.
अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात अडकू नये
देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या (stagflation) विळख्यात अडकणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी, असं संजीव मेहता यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितलं. मंदीमुळे विकासदर कमी होतो, तर महागाई वाढते. या काळात बेरोजगारीची समस्याही बिकट होऊ लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठी मेहता यांनी भांडवली खर्च योजना अधिक वेगाने राबवण्याची सूचना सरकारला केली आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात सरकारने साडेसात लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सुरुवातीला अधिकाधिक खर्च करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.
महागाईमुळे वाढ दिसत नाही
कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक म्हणाले की, महागाई खूप वेगाने वाढत आहे, त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. महागाईचा प्रत्येक व्यक्तीवर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याने रिझर्व्ह बँकेने लवकरात लवकर लक्ष केंदीत करावे, असे उदय कोटक सुचवतात. आर्थिक घडामोडींमध्ये जे काही सुधारणा होत आहे, ते महागाईच्या कचाट्यात जात आहे.
महागाईवर रिझर्व्ह बँकेचे लक्ष
एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँकेनेही महागाई प्रचंड वेगाने वाढत असल्याचं म्हटलं होतं. तीन महिन्यांपासून महागाईने रिझर्व्ह बँकेची 6 टक्क्यांची वरची मर्यादा ओलांडली आहे. त्यानंतर मार्चमध्ये ती 17 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले होते की, आता मध्यवर्ती बँकेचे लक्ष वृध्दी ऐवजी वाढत्या महागाईवर आहे.