देशातील सुप्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे सीईओ (CEO of Infosys) सलील पारेख यांच्या पगारात प्रचंड वाढ झाली आहे. इन्फोसिसने सीईओच्या पगारात ८८ टक्के वाढ केली आहे. पगारात ८८ टक्के वाढ झाल्यानंतर सलील पारेख यांचा वार्षिक पगार ४२ कोटींवरून ७९.७५ कोटी झाला आहे. सॉफ्टवेअर कंपनीने सीईओच्या पगारात केलेल्या प्रचंड वाढीचे समर्थन करत असे म्हटले आहे की सलीलच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने प्रभावी वाढ केली आहे. इन्फोसिसने सलील पारेख यांच्या पगारात वाढ (Increase in salary) करण्याचा हा निर्णय, त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्याच्या निर्णयानंतर घेतला आहे. आता सलील 31 जुलै 2027 पर्यंत इन्फोसिसचे सीईओ राहतील. कोणत्याही कंपनीने आपल्या उच्च अधिकाऱ्याच्या पगारात एवढी वाढ करणे धक्कादायक आहे. इन्फोसिसने गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात (In the annual report) सीईओ सलील पारेख यांच्या पगारवाढीबाबत मोठे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
काय आहे कंपनीची भूमिका
इन्फोसिसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सलील पारेख यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी बदलली आणि इन्फोसिसची स्थिरता देखील बहाल केली. इन्फोसिसने अलीकडेच पुढील ५ वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदासाठी सलील पारेख यांची पुनर्नियुक्ती केली आहे. सलील पारेख यांचा नवीन कार्यकाळ 1 जुलै 2022 ते 31 मार्च 2027 पर्यंत असेल. सलील पारेख यांनी IT उद्योगात 30 वर्षांहून अधिक काळ घालवला आहे
सलील पारेख यांच्या करीअरचा प्रवास
सलील पारेख यांनी जानेवारी 2018 मध्ये इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. सलील पारेख यांना IT उद्योगात काम करून 30 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या उद्योगासाठी ते खूप अनुभवी व्यक्ती आहे. सलील पारेख यांनी Infosys मध्ये रुजू होण्यापूर्वी 25 वर्षे Capgemini येथे काम केले. कॅपजेमिनी सोडताना सलील गट कार्यकारी मंडळाचा सदस्य होते. महत्त्वाचे म्हणजे, इन्फोसिसने एप्रिल 2022 मध्ये चौथ्या तिमाहीचे निकाल सादर केले होते. इन्फोसिसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चौथ्या तिमाहीत त्यांना 5,686 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 12 टक्के अधिक आहे. मात्र, तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 2 टक्के कमी झाला आहे.