नवी दिल्ली : विश्वास तर कसाच नाही बसणार, पण जगभरात केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात, या शहरात सर्वाधिक पगार देण्यात येतो. बेंगळुरु आणि मुंबई शहरापेक्षा पण या शहरात अधिक वेतन मिळते. जुलै, 2023 पर्यंतच्या सरासरी पगाराच्या सर्व्हेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, देशात काहींचा सरासरी पगार (Highest Average Salary) 18,91,085 रुपये आहे. तर सर्वसामान्यांची वार्षिक कमाई 5,76,851 रुपये आहे. महिला आणि पुरुषांच्या वेतनात मोठी तफावत आहे. पुरुष कर्मचाऱ्यांचे वार्षिक सरासरी वेतन 19 लाख 53 हजार रुपये तर महिला कर्मचाऱ्यांचे वार्षिक सरासरी वेतन 15 लाख 16 हजार रुपये आहे.
138 देशांमध्ये सर्व्हे
जगभरातील 138 देशांमध्ये सरासरी वेतनासंबंधीचा सर्व्हे करण्यात आला. त्याचे विश्लेषण करण्यात आले. भारतात या सर्व्हेक्षणात 11,570 लोकांचा समावेश होता. त्यांच्या वेतनाआधारे सरासरी पगाराचा आकडा काढण्यात आला. जास्त करुन मॅनजमेंट आणि बिझनेस क्षेत्रात सरासरी पगार जास्त आहे. या क्षेत्रात वार्षिक सरासरी पगार 29 लाख 50 हजार 185 रुपये आहे. त्यानंतर वकिली क्षेत्रातील लोकांची मिळकत जास्त आहे. वार्षिक सरासरी कमाई 27 लाख 2 हजार 962 रुपये आहे.
अनुभवाआधारे किती पगार
सर्वेतील आकडेवारीनुसार, 20 वर्षांपेक्षा अधिक कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना वार्षिक सरासरी 38 लाख 15 हजार 462 रुपये पगार मिळतो. 16 ते 20 वर्षांचा अनुभव असणाऱ्या लोकांना 36 लाख 50 हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन आहे. तर डॉक्टरेट करणाऱ्यांचे सरासरी वार्षिक वेतन 27 लाख 52 हजार रुपायंपेक्षा अधिक आहे. हायस्कूलपर्यंत शिक्षण घेणारे सरासरी वार्षिक 11 लाख 12 हजारपेक्षा अधिकची कमाई करतात.
या शहरात सर्वाधिक वेतन
आता इथं या सर्वेक्षणावरच शंका येते. कारण या सर्व्हेनुसार, देशातील अनेक शहरात चांगला पगार आहे. पण सर्वाधिक पगार सोलापूर शहरात मिळतो, असा दावा करण्यात आला आहे. याठिकाणी केवळ दोन जणांच या सर्व्हेत सहभागी करुन घेण्यात आले होते. याठिकाणी सरासरी वार्षिक 28 लाख 10 हजार 092 रुपये मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर मुंबईतील 1,748 लोकांचा सर्व्हे करण्यात आला. या शहरात वार्षिक सरासरी 21 लाख 17 हजार रुपये वेतन आहे. तर बेंगळुरु शहरात वार्षिक सरासरी 21.01 लाख रुपये वेतन आहे. या शहरातील जवळपास 2,800 लोकांनी सहभाग घेतला होता. दिल्लीत वार्षिक सरासरी 20 लाख 43 हजार 703 रुपये वेतन आहे.
हे राज्य अग्रेसर
या यादीत पहिले स्थान उत्तर प्रदेश सरकारने पटकावले आहे. येथील एका व्यक्तीचे सरासरी मासिक वेतन 20,730 रुपये आहे. देशात सर्वाधिक सरासरी मासिक वेतन देणारे हे पहिले राज्य ठरले आहे. दुसऱ्या स्थानावर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. येथील वेतनदार 20,210 रुपये सरासरी मासिक वेतन घेतो. पश्चिम बंगालमध्ये फार मोठे उद्योग नसताना पण या यादीत पश्चिम बंगालने दुसरे स्थान पटकावले आहे. तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्य आहे. येथील पगारदाराला 20,011 रुपये सरासरी मासिक वेतन मिळते.