Sri Lanka financial crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; शेअर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय
श्रीलंकेतून आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील प्रमुख शेअर बाजार असलेल्या कोलंबो स्टॉक एक्सचेंजची उलाढाल आजपासून पुढील पाच दिवस ठप्प राहणार आहे. श्रीलंकेच्या सिक्योरिटीज कमीशनकडून शेअर बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
श्रीलंकेत (Sri Lanka) आर्थिक संकट भीषण बनले आहे. देश कर्जबाजारी झाला आहे. परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दैनंदीन लागणाऱ्या वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अव्वाच्या -सव्वा किंमत देऊन देखील इंधन मिळत नसल्याने नागरिकांच्या पेट्रोल पंपाबाहेर रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. या रांगेत काही दिवसांपूर्वी तीन वृद्धांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून पेट्रोल पंपावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. आता यात भरीसभर म्हणजे श्रीलंकेतून आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील प्रमुख शेअर बाजार असलेल्या कोलंबो स्टॉक एक्सचेंजची उलाढाल आजपासून पुढील पाच दिवस ठप्प राहणार आहे. श्रीलंकेच्या सिक्योरिटीज कमीशनकडून शेअर बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाच दिवस शेअर बाजार बंद
ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडून शनिवारी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात पुढील पाच दिवस शेअरबाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेअर बाजाराचा सध्या परिस्थितीवर पडणारा प्रभाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील पाच दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे.
राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी
श्रीलंकेमध्ये महागाईचा भडका उडाला आहे, आर्थिक संकट गंभीर बनले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता जनता रस्त्यावर उतरली असून, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. 81 बिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या हा देश सध्या कर्जाच्या खाईत सापडला असून, देशावर 8.6 बिलियन डॉलर कर्ज झाले आहे. काही दिवसांपूर्वी लोकांनी रस्त्यावर उतरत हिंसक निर्दशने देखील केली होती. या सर्वांमागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आता आर्थिक संकटा पाठोपाठ राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.