Pan Card बंद असले तरी फाईल करु शकता इनकम टॅक्स रिटर्न, ही आहे पद्धत
जर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले असले तरी तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. इतर करदाते ज्या प्रक्रियेचा वापर करुन आयटीआर भरतात. त्याच पद्धतीने रिटर्न फाईल करता येईल. ज्या लोकांना ऑडिटची गरज नाही, त्यांच्यासाठी रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2024 ही आहे.
जर तुम्हाला जून 2023 या अंतिम मुदतीपर्यंत तुमचे पॅनकार्ड आधारसोबत लिंक करता आले नसेल आणि तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले असेल तर चिंता करु नका. तुम्हाला तुमचे इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार आहे. याविषयीची माहिती आयकर विभागाने यापूर्वीच दिली आहे. ज्या करदात्यांन ऑडिटची गरज नाही, त्यांच्यासाठी आर्थिक वर्ष 2023-24 (मूल्यांकन वर्ष 2024-25) चे रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2024 ही आहे.
तज्ज्ञांचे मत काय
टॅक्स2विनचे सीईओ आणि सहसंस्थापक अभिषेक सोनी यांनी मीडियाला माहिती दिली. त्यानुसार, जून 2023 पर्यंत जर करदात्याने आधारसोबत पॅन लिंक केले नसेल आणि पॅन निष्क्रिय झाले असेल तरीही तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न दाखल करु शकता. सोनी यांच्या मतानुसार, पडताळणी प्रक्रियेत आधारच्या ओटीपीचा समावेश नसेल. त्याऐवजी नेट बँकिंग, एटीएम वा इतर योग्य माध्यमांचा आधारे इलेक्टॉनिक सत्यापन कोड(EVC) जनरेट करुन त्याचा वापर करण्यात येईल.
पॅन निष्क्रिय असताना असे फाईल करा आयटीआर
- डेलॉईट हास्किन्स अँड सेल्स एलएलपीचे निदेशक विजय भरेच यांनी याविषयी माहिती दिली. पॅन निष्क्रिय झाल्यावरही करदात्यांना कराचा भरणा करता येईल. त्यांना आयकर रिटर्न दाखल करता येईल. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया तीच आहे, तुमचे पॅन जरी निष्क्रिय झाले असले तरी या प्रक्रियेत बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- करदात्याला इनकम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर त्यांच्या खात्यात लॉग-इन करावे लागले. त्यानंतर ई-फाईल विभागात दिशा निर्देशानुसार इनकम टॅक्स रिटर्न दाखल करावा करण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यासाठी सविस्तर विवरण आणि कागदपत्रही जमा करावी लागतील.
ही आहे अंतिम तारीख
अपडेटेड रिटर्न भरण्यासाठी अंतिम तारीख 31 मार्च असते. अद्ययावत रिटर्नचा वापर करुन करदाते संबंधित मूल्यांकन वर्षांपासून 2 वर्षांपर्यंत या रिटर्नमध्ये सुधारणा करु शकतात. 31 मार्च 2024 रोजी अंतिम मुदत संपत आहे. ही अंतिम मुदत आर्थिक वर्ष 2020-21 चे 2021-22 मूल्यांकन वर्षासाठी अद्ययावत आयकर विवरणपत्र भरण्यास पात्र आहे.
इतका लागतो दंड
अद्ययावत आयकर रिटर्न भरण्याची सुविधा 1 एप्रिल 2022 रोजीपासून सुरु झाली आहे. करदात्यांसाठी ही योग्य संधी आहे. जर जुन्या आयटीआरमध्ये काही माहिती भरणे बाकी असेल वा प्राप्तिकर नियमांनुसार रिटर्न फाईल करण्याची आवश्यकता असताना, तसे फाईल करता आले नसेल, तरी ही संधी आहे. ही शेवटची संधी सोडणे नुकसानदायक ठरते. जर यानंतर तुम्ही आयकर खात्याच्या पंजात अडकलात तर करपात्र रक्कमेपेक्षा 200 टक्के दंड तुमच्याकडून वसूल करण्यात येतो.