कॅनडा | 25 ऑक्टोबर 2023 : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध दुरावल्यानंतर बंद केलेली व्हीसा सेवा आता पुन्हा सुरु केली आहे. भारत 26 ऑक्टोबरपासून कॅनडातील काही व्हीसा सेवा पुन्हा सुरु करीत आहे. बुधवारी ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की चार प्रकारच्या व्हीसा सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. यात प्रवेश व्हीसा, बिझनेस व्हीसा, मेडीकल व्हीसा आणि कॉन्फरन्स व्हीसा यांचा समावेश आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी 18 सप्टेंबर रोजी भारतावर खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरुन आरोप केले होते. भारताने हे सर्व आरोप फेटाळले होते, मात्र त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. त्यानंतर भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हीसा जारी करण्यास बंदी घातली होती. आता भारताने ही व्हीसा बंदी उठवली असून आता पुन्हा चार प्रकारच्या व्हीसासाठी अर्ज करता येणार असल्याचे कॅनाडातील ओटावा येथील भारतीय दुतावास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यात प्रवेश व्हीसा, बिझनेस व्हीसा, मेडीकल व्हीसा आणि कॉन्फरन्स व्हीसा यांचा समावेश आहे. ओटावा येथील उच्चायुक्तांनी हा निर्णय सुरक्षा स्थितीचा सखोल अभ्यास केल्यानंतर घेतला आहे. व्हीसासाठी आता येत्या 26 ऑक्टोबर पासून अर्ज करता येणार आहेत.
व्हीसा सेवा पुन्हा सुरु केल्याने कॅनडामध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या हत्येमुळे निर्माण झालेला दोन्ही देशातील तणाव कमी होणार आहे. भारताने गेल्या महिन्यात कॅनडाच्या लोकांसाठी नवीन व्हीसा देणे थांबविले होते. त्यानंतर कॅनडाने देखील आपले 41 अधिकाऱ्यांना पुन्हा माघारी बोलावले होते.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी खलिस्तानवादी नेते हरदीप सिंह निज्जर यांची हत्येत भारत सरकारच्या एजंटवर संशय असल्याचा आरोप केला होता.