युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine Crisis) सुरू आहे. रशियाने युद्ध बंद करावे यासाठी अमेरिका आणि नाटोचे सदस्य असलेल्या युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव आणला जात आहे. रशियावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची (Crude Oil) निर्यात देखील बंद करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. अमेरिका आणि यूरोपीयन राष्ट्रांचा दबाव असला तरी देखील भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात (Import) सुरूच ठेवणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे. रशिया हा कच्च्या तेलाचा एक प्रमुख निर्यातदार देश आहे. रशियामधून युरोपीयन राष्ट्रांना कच्च्या तेलाचा पुरवठा होत होता. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे रशियाने भारताला स्वस्त कच्चे तेल पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे भारताने जर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यास देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होऊ शकतात.
भारत आणि रशियामध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. तसेच रशियाने भारताला कच्चे तेल खरेदी करण्यासाठी आकर्षक ऑफर दिली आहे. व्यवहार भारतीय चलनामध्ये होणार आहे. या सर्व गोष्टी भारताच्या बाजूने असल्यामुळे भारत रशियाच्या ऑफरवर गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती उच्चपदस्त सूत्रांकडून मिळत आहे. रशियाकडून भारताला प्रति बॅरल 35 डॉलर डिस्काउंटची ऑफर देण्यात आली आहे. भारत हा कच्च्या तेलाचा तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा आयातदार देश असून, आपल्याला कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीमध्ये जर रशियाने भारताला स्वस्त किमतीमध्ये कच्चे तेल दिले तर भारताचा मोठा फायदा होऊ शकतो.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या़ दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल दहा वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. शुक्रवारी इंधनाचे दर स्थिर होते. त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र शनिवारी आज पुन्हा एकदा इंधनाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे, नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.61 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये जर भारताने रशियाकडून मिळत असलेले स्वस्त कच्चे तेल मोठ्याप्रमाणात खरेदी केले तर भविष्यात पेट्रोल, डिझेच्या किमती स्वस्त होऊ शकतात.
Emergency in SriLanka: श्रीलंकेत नागरिक रस्त्यावर, आंदोलनाला हिंसक वळण; सरकारकडून आणीबाणीची घोषणा
Petrol,Diesel Price Hike : इंधनाच्या किमतीमध्ये आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर