Indian Economy : अनेक अर्थसत्तांना मंदीने ग्रासले, भारतीय अर्थव्यवस्थेला कोणता मिळाला बुस्टर डोस!
Indian Economy : जागतिक अर्थव्यवस्था आणि अनेक अर्थसत्तांना मंदीने ग्रासले. अशावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला कोणता बुस्टर डोस मिळाला, याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले.
नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : जगातील अनेक अर्थव्यवस्था (Economy) सध्या पेचात अडकल्या आहेत. वाढत्या महागाईने तिथल्या अर्थव्यवस्था गांगारुन गेल्या आहेत. अमेरिका, चीन आणि युरोपातील या मोठ्या अर्थव्यवस्था पण सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. पण भारताची अर्थव्यवस्था या मंदीला पुरुन उरली आहे. भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने नवीन रेकॉर्ड करत आहे. अर्थव्यवस्था आता पाचव्या स्थानावर पोहचली आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि अनेक अर्थसत्तांना मंदीने ग्रासले. अशावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला कोणता बुस्टर डोस मिळाला, याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दिले.
जगातील अर्थव्यवस्था संकटात
निर्मला सीतारमण यांनी आज संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था संकटात आल्या आहेत. वर्ष 2022 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 3 टक्के दरांनी वाढली. जागतिक बँकेने याविषयीचा एक अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत 2.1 टक्के घसरण झाली. काही विकसीत देशांची स्थिती पण चांगली नाही,असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
इंग्लंडची स्थिती बिकट
बँक ऑफ इंग्लंडने व्याज दरात सातत्याने 14 वेळा वाढ झाली. युरोपियन महासंघात पण हीच स्थिती आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये सर्वाधिक व्याज दर युरोपियन युनियनने गाठला आहे. युरोपियन सेंट्रल बँकेने सातत्याने 9 वेळा व्याज दरात मोठी वाढ केली आहे. सध्या हा व्याजदर गेल्या 23 वर्षांच्या उच्चांकावर आहेत.
युरोपला फटका
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी युरोपची अर्थव्यवस्था सर्वाधिक अडचणीत असल्याचे सांगितले. जर्मनीसमोर सर्वाधिक आव्हान असल्याची माहिती त्यांनी दिली. या वर्षात 2023 मध्ये जर्मनीची अर्थव्यवस्था 0.3 टक्क्यांनी घसरल्याचे त्यांनी सांगितले.
युएस-चीनचे रेटिंग घटले
चीन ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. पण सध्या ती वाईट अवस्थेतून जात आहे. चीनमध्ये ग्राहकांनी मागणी कमी केली आहे. त्याचा मोठा फटका बसत आहे. अमेरिका पण या संकटापासून दूर नाही. अमेरिकेचे रेटिंग घसरले आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे त्यांनी सांगितले. पण भारत अशा स्थितीत भरधाव पुढे जात असल्याचा दावा त्यांनी केला.
आर्थिक स्तरावर अनेक सुधारणा
गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. आज भारत सर्वात वेगाने वृद्धी करणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. तर अमेरिका आणि चीनचे रेटिंग घटले आहे. अनेक जागतिक मानांकन संघटना भारतीय अर्थव्यवस्थेला चांगले रेटिंग देत आहेत. कोविड संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली. जन धन योजना, डिजिटल इंडिया, आयुष्मान भारत योजना आणि जन औषधी केंद्र यासारख्या योजनांचा मोठा फायदा झाल्यानेच भारतीय अर्थव्यवस्था वेगवान झाल्याचे त्यांनी सांगितले.