Railway Journey : एकाच तिकिटावर करा भारत भ्रमंती, बदला 8 वेळा ट्रेन, रेल्वेची योजनाच भारी
Railway Journey : एकाच तिकिटावर देश पर्यटन करता येईल.
नवी दिल्ली : एका रेल्वे तिकिटावर (Train Ticket) तुम्ही एका स्टेशनवरुन दुसऱ्या स्टेशनपर्यंत प्रवास करता येतो, असे अनेक प्रवाशांना वाटते. पण एकाच रेल्वे तिकिटावर तुम्ही 8 वेगवेगळ्या स्टेशनवर विविध ट्रेनचा प्रवास करता येतो, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रेल्वे सर्कुलर जर्नी तिकीट (Circular Journey Ticket) या नावाने हे विशेष तिकीट देते. या तिकिटामुळे यात्रेकरू अनेक स्टेशनवर फिरु शकतो.
सर्वसाधारणपणे तिर्थयात्रा आणि पर्यटनस्थळाला भेट देणारे अनेक पर्यटक, यात्रेकरु, प्रवाशी या योजनेचा फायदा घेतात. सर्कुलर तिकीट खरेदी केल्यास कोणत्याही श्रेणीतील प्रवास करता येतो. हे तिकीट तुम्ही थेट तिकीट खिडकीतून खरेदी करु शकत नाही. त्यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो.
देशभरात पर्यटन करण्यासाठी, तीर्थाटन करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या प्रवासाची माहिती रेल्वेला सादर करावी लागते. या तिकिटासाठी एक गोष्ट महत्वाची आहे. या प्रवासासाठी यात्रा ज्या ठिकाणाहून सुरु होते, त्याच ठिकाणी ती संपणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवासाची सुरुवाती झाली तिथेच तो प्रवास संपविणे आवश्यक आहे.
जर तुम्ही दुरच्या प्रवासाला निघाला असाल तर विविध स्टेशनवर वेगवेगळे तिकीट खरेदी करण्यापेक्षा या सर्कुलर तिकिटाच्या मदतीने हा प्रवास करता येतो. तुमच्या पर्यटन ठिकाणानुसार, प्रवासाचे नियोजन करु शकतात. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि खर्चातही मोठी बचत होते.
तुम्ही वेगवेगळ्या स्टेशनवर तिकीट खरेदी केल्यास हा प्रवास महागात पडतो. पॉईंट टू पॉईंट दर लागत नसल्याने सर्कुलर तिकीटाचा प्रवास स्वस्तात होतो. तसेच प्रवाशाला कुठल्याही श्रेणीतील प्रवास करता येतो. या तिकिटाची वैधता ही खूप दिवस असते. त्यामुळे मनाजोगा प्रवास करता येतो.
जर तुम्ही नवी दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंत सर्कुलर जर्नी तिकीट खरेदी कराल. तर हा प्रवास नवी दिल्लीपासून याच ठिकाणी संपावा लागेल. 7,550 किलोमीटरच्या या प्रवासासाठी सर्कुलर तिकीट 56 दिवसांसाठी वैध राहिल.