अरे फरक नाही पडत; Sensex ची 1000 अंकांची उसळी, मग अदानींच्या शेअरची कशी कामगिरी?

| Updated on: Nov 22, 2024 | 3:38 PM

Sensex, Share Market : भारतीय शेअर बाजार गेल्या काही महिन्यांपासून गटांगळ्या खात आहे. बाजार ट्रॅकवर यायला लागला तर कुठे तरी माशी शिंकते आणि पुन्हा बाजाराला ताप चढतो. आता स्थिर स्थावर होत असलेल्या शेअर बाजाराला अदानी वादाने हुडहुडी भरली. पण आज बाजाराने जोरदार कामगिरी दाखवली.

अरे फरक नाही पडत; Sensex ची 1000 अंकांची उसळी, मग अदानींच्या शेअरची कशी कामगिरी?
सेन्सेक्सची भरारी
Follow us on

भारतीय शेअर बाजाराला गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी आणि ताप भरला आहे. बाजार सुरळीत होत असताना पुन्हा काही तरी घटना घडते आणि बाजार घसरतो. त्यात परदेशी पाहुणे तळ्यात-मळ्यात करत असल्याने शेअर बाजाराला मोठी झेप घेता आलेली नाही. त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून गौतम अदानी यांच्या अमेरिकेतील वादाने बाजाराचे उरल सुरलं आवासान काढून घेतलं. पण आज बाजाराने कशाचीच पर्वा केली नाही. अदानी शेअरसोबतच बाजाराने पुन्हा फिनिक्स भरारी घेण्याचा प्रयत्न केला. सेन्सेक्स 1000 अंकांनी उसळला. त्यामुळे अखेरच्या व्यापारी सत्रात गुंतवणूकदारांच्या मनावरील मळभ हटले. बाजाराला पुन्हा भरते आल्याने गुंतवणूकदार धन्य झाले.

बाजाराची जोरदार घरवापसी

भारतीय बाजारावर गेल्या दोन दिवसांपासून अदानी-अमेरिका वादाचे सावट दिसले. अदानीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. भारतीय उद्योजकावर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने बाजारात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती. पण शुक्रवारी बाजाराने सर्व मळभ दूर केले. बाजाराला तेजीचे भरत आले. अदानी समूहातील जवळपास सर्वच शेअरने मोठा पल्ला गाठला.

हे सुद्धा वाचा

S&P BSE सेन्सेक्स 1034.76 अंकांनी वधारली. तो दुपारी 78190.55 अंकावर पोहचला. तर दुसरीकडे NSE Nifty50 329.15 अंकांनी वधारला. दुपारी निफ्टी 23,679/05 अंकावर व्यापार करत होता. या दमदार कामगिरीमुळे बीएसईच्या एकूण भांडवलात अजून 5 लाख कोटी रुपयांची भर पडली.

बँकिंग, आर्थिक, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअरने मोठी झेप घेतली. या क्षेत्रातील कंपन्यांनी बाजार तोलून धरलाच नाही तर बाजाराला उभारी दिली. या सेक्टरमधील शेअरने दमदार कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्स वरच्या दिशेला ओढला. ICICI Bank, State Bank of India, Reliance Industries, Infosys, Tata Consultancy Services, L&T, Bharati Airtel यांनी या पडझडीच्या काळात बहुमोल साथ दिल्याने सेन्सेक्सने उभारी घेतली.

अदानी समूहाची कामगिरी

अदानी समूहावर अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप झाल्याने देशात एकच खळबळ माजली. समूहाने याप्रकरणी हात झटकले आहेत. आज समूहाची कामगिरी चांगली राहिली. कालच्या घसरणीनंतर अम्बुजा सिमेंट 6 टक्क्यांनी तर एसीसी सिमेंटने जवळपास 4 टक्क्यांची वसूली केली. फ्लॅगशीप कंपनी अदानी एंटरप्राईजेस 2.5 टक्क्यांनी वधारला. तर अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅसमध्ये आज 1-2 टक्क्यांची उसळी दिसली.