भारतीय शेअर बाजाराची घौडदौड, एका पाठोपाठ एक रेकॉर्ड
Share Market | भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली आहे. बीएसई आणि एनएसईची घौडदौड सुरु आहे. बीएसईने मंगळवारी मोठी झेप घेतली. नवीन इतिहास रचला. आता बीएसई लवकरच 4 ट्रिलियन डॉलरच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. बीएसईने हा टप्पा गाठला तर कंपन्यांसोबतच गुंतवणूकदारांचे पण चांगभलं होईल.
नवी दिल्ली | 29 नोव्हेंबर 2023 : भारतीय शेअर बाजारने मंगळवारी नवीन इतिहास रचला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारातील भांडवल पहिल्यांदा 331 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचले. आता बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलर म्हणजे 333 लाख कोटींहून अधिक रुपयांच्या घरात पोहचणार आहे. यामुळे कंपन्यांचे मार्केट कॅप वाढेल. तर गुंतवणूकदारांना पण त्याचा मोठा फायदा होईल. जगभरात मंदीचे वातावरण सुरु असताना भारतीय शेअर बाजाराची घौडदौड ही निश्चितच आश्वासक आहे.
पहिल्याच सत्रात आनंदवार्ता
गुरुनानक जयंतीमुळे या आठवड्यात सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी होती. मंगळवारच्या व्यापारी सत्रात जोरदार तेजी दिसून आली. अदानी समूहाने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. या खरेदी सत्राचा मोठा परिणाम झाला. शेअरमध्ये मोठी उलाढाल झाली. अदानी समूहाचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची उसळी दिसून आली. त्यामुळे बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 2.4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
अदानीचे मार्केट कॅप वाढले
अदानी समूहाचे एकूण मार्केट कॅप 11 लाख कोटींच्या पुढे गेले. यावर्षी 24 जानेवारी रोजी ते 19.19 लाख कोटी रुपये होते. त्याच दिवशी हिंडनबर्गचा अहवाल जगजाहीर झाला होता. सध्या हे मार्केट कॅप 40 टक्के कमी आहे . हिंडनबर्गच्या आरोपांच्या फैरीनंतर कंपनीचे मार्केट कॅप 150 अब्ज डॉलरने घसरले होते.
बीएसईचे मार्केट कॅप 331.05 लाख कोटी
मुंबई स्टॉक एक्सचेंजवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 331.05 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. सध्या रुपयाचा एक्सचेंज रेट 83.34 प्रति डॉलरवर आहे. त्या हिशोबाने बाजाराचे भांडवल 3.97 ट्रिलियन डॉलरवर पोहचले आहे. 24 मे 2021 रोजी पहिल्यांदा बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन 3 ट्रिलियन डॉलरच्या स्तरापर्यंत पोहचले होते.
हिंडनबर्गचा बसला फटका
हिंडनबर्ग रिसर्चचा मोठा फटका अदानी समूहालाच नाही तर भारतीय शेअर बाजाराला पण बसला होता. जानेवारी 2023 मध्ये या अहवालाने वादळ आणले. मार्चपर्यंत बाजारात घसरणीचे सत्र सुरु होते. बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप घसरले आणि मार्च 2023 मध्ये 255.64 लाख कोटी रुपयांवर आले. पण गेल्या 8 महिन्यात परदेशी आणि देशातील गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीवर हे वादळ थोपविण्यात यश आले. बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 331 कोटी रुपयांवर पोहचले. या काळात गुंतवणूकदारांची संपत्ती 75 लाख कोटी रुपयांनी उसळली.