टाईम मॅगझिनच्या यादीत जगातील सर्वात्तम 100 कंपन्यात भारताची केवळ हीच कंपनी समाविष्ट
जगातील सर्वोत्तम 100 कंपन्यांत भारतातील केवळ एकाच कंपनीची निवड झाली आहे. टाईम मॅगझिन आणि ऑनलाईन डेटा प्लॅटफॉर्म स्टॅटिस्टा यांनी 2023 मध्ये जगाचे अर्थकारण बदलणाऱ्या एक सूची बनविली आहे.
नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : टाईम मॅगझिन आणि ऑनलाईन डेटा प्लॅटफॉर्म आणि स्टॅटिस्टा यांनी जगाला बदलवून टाकणाऱ्या 750 कंपन्याची यादी तयार केली आहे. जगाच्या आर्थिक व्यवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या 100 सर्वोत्तम कंपन्यात भारताच्या केवळ एका कंपनीचा समावेश झाला आहे. भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस या कंपनीलाच केवळ 100 सर्वोत्तम कंपन्यात स्थान मिळविता आले आहे. या यादीत इन्फोसिस कंपनीचा 64 वा क्रमांक आला आहे.
या कंपन्याच्या यादीत मायक्रोसॉफ्ट, ॲप्पल, अल्फाबेट ( गुगल संबंधित कंपन्या ) आणि मेटा प्लॅटफॉर्म ( आधीची फेसबुक ) या टेक्नॉलॉजी कंपन्या या यादीत प्रमुख स्थानी आहेत. ही रॅकींग महसुलवाढ, कर्मचाऱ्यांचे समाधान आणि पर्यावरण, सामाजिक आणि कॉर्पोरेट प्रशासन ( ईएसजी किंवा स्थिरता ) या आधारे केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत एकेकाळी मॅन्युफॅक्चरींग कंपन्या आणि कंझ्युमर गुड्स कंपन्यांना बोलबाला होता. आता व्यावसायिक सेवा आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांनी बाजी मारली आहे.
टेक कंपन्याची चांगली कामगिरी
टाईम मॅगझिनने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की टेक कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. कारण त्यांचे कार्बन उत्सर्जन एअरलाईंस, हॉटेल किंवा मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांच्या तुलनेत खुपच कमी आहे. या कंपन्यांची रॅंकींग यासाठी देखील चांगली आहे की त्यांचे कर्मचारी अधिक आनंदी आहेत. प्रमुख चार कंपन्यांना कर्मचारी रॅंकींगमध्ये सर्वोत्तम गुण मिळाले आहेत. गेल्या तीन वर्षांत आर्थिक नफा मिळविण्यासोबतच कंपनीने आपले कार्बन उत्सर्जन करणे, आपल्या बोर्डात अधिकाधिक महिलांची नियुक्ती करणे आणि अन्य सामाजिक दायित्व निभावण्यात पुढाकार घेतल्याने त्यांना उत्तम रॅंकींग मिळाली आहे.
अन्य भारतीय कंपन्यांची स्थिती
इन्फोसिस शिवाय सात अन्य भारतीय कंपन्याचे टाईमच्या यादीत नाव सामील आहे. त्यात विप्रो लिमिटेड 174 व्या, महिंद्र ग्रुप 210 व्या, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 248 व्या, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड 262 व्या, एचडीएफसी बॅंक 418 व्या, डब्ल्युएनएस ग्लोबल सर्व्हीसेस 596 व्या आणि आयटीसी लिमिटेड 672 व्या स्थानावर स्थान मिळाले आहे. इन्फोसिसला जगातील प्रमुख तीन व्यावसायिक सेवा कंपन्यात स्थान मिळाले आहे.