नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांना वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर, लक्की ठरला आहे. अदानी समूह सातत्याने विस्तार करत आहे. वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्गने या समूहाचा पाया हदरवला. मध्यंतरी या समूहातील अनेक कंपन्याचे शेअर धराशायी पडले. गुंतवणूकदारांसह समूहाचे मोठे नुकसान झाले. पण गेल्या एका महिन्यात अनेक चांगल्या वार्ता समोर आल्या. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसली. या सर्व घडामोडींने समूहाचा उत्साह दुणावला. गौतम अदानी यांनी एका दमात चार नवीन कंपन्या उभ्या केल्या. भविष्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात समूह मोठी कामगिरी बजावू शकतो.
या आहेत चार नवीन कंपन्या
PTI च्या वृत्तानुसार, गौतम अदानी यांच्या नेतृत्वात अदानी ग्रीन एनर्जीने ही कामगिरी केली आहे. अदानी ग्रीन एनर्जीने चार नवीन सहाय्यक कंपन्या तयार केल्या आहेत. यामध्ये अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्सटी, अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्सटी टू, अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्सटी थ्री आणि अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्सटी फोर अशी त्यांची नावे आहेत.
स्टॉक एक्सचेंजला दिली माहिती
अदानी समूहाने या चार उपकंपन्यांचे भांडवल सध्या प्रत्येकी एक एक लाख रुपये ठेवले आहे. अदानी ग्रीन एनर्जीने सोमवारी शेअर बाजाराला या नवीन कंपन्यांची अपडेट दिली. अदानी रिन्युएबल एनर्जी होल्डिंग नाईन अंतर्गत 18 डिसेंबर रोजी या चार उपकंपन्या गठीत केल्याचे कळविण्यात आले आहे. या कंपन्यांची नोंदणी गुजरातमधील अहमदाबाद येथे करण्यात आली आहे.
Adani Green चा शेअर तेजीत
नवीन कंपन्यांची घोषणा होताच अदानी ग्रीनचा शेअर तेजीत आला आहे. गेल्या व्यापारी सत्रात, सोमवारी अदानी ग्रीन एनर्जी हिरव्या रंगात न्हाऊन निघाला. काल बाजार बंद होताना हा शेअर 1529 रुपयांवर होता. तर आज दुपारी 15:04 वाजता हा शेअर 1534 रुपयांवर होता. या कंपनीचे बाजार भांडवल 2.42 लाख कोटी रुपये आहे. अजून हा शेअर त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा कमी आहे. अदानी ग्रीन शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 2185 रुपये आहे.