inflation! अमेरिकेत महागाईचा भडका, महागाई गेल्या 40 वर्षांतील सर्वोच्च स्तरावर; भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिकेमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. किरकोळ महागाई गेल्या चाळीस वर्षांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. महागाई वाढत असल्याने व्याज दर वाढीचा दबाव निर्माण झाला आहे. व्याज दर वाढल्यास भारताला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई : अमेरिकेमधील मे महिन्यातील महागाईची आकडेवारी (US inflation data) समोर आली आहे. अमेरिकन लेबर डिपार्टमेंटच्या वतीने ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. मे महिन्यात कंझ्यूमर प्राइस इंडेक्स हा गेल्या चाळीस वर्षांतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. परिणामी अमेरिकेत किरकोळ महागाईत (Retail inflation) मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात सीपीआय अर्थात कंझ्यूमर प्राइस इंडेक्स हा वार्षिक आधारावर 8.6 टक्के एवढा राहिला आहे. मासिक आधारावर त्यामध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर 8.3 टक्के इतका होता. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात किरकोळ माहागाईमध्ये 0.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महागाईमध्ये वाढ होत आहे. (High inflation rate) खाण्यापिण्याच्या वस्तुंसह पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका हा मध्यम वर्गाला बसत असल्याचे पहायला मिळत आहे.
व्याज दर वाढवण्याचा दबाव
मार्च 2022 मध्ये प्रथमच अमेरिकेतील महागाई 1982 नंतर 8.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. महागाई वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकन फेडरल रिझर्व्हवर व्याज दरवाढीचा दबाव निर्माण झाला आहे. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारीच रेपो रेटमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ केली आहे. आता लवकरच वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासााठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह देखील व्याज दरात वाढ करण्यची शक्यता आहे. व्याज दरात वाढ करून देखील महागाई स्थर हा सात टक्क्यांच्या खाली येण्याची शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी वर्तवले आहे. अमेरिकेमध्ये महागाई वाढत आहे. मात्र याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊयात.
शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूक कमी होणार
अमेरिकेने व्याज दरात वाढ केल्यास त्याचा मोठा फटका हा शेअर बाजाराला बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतीय शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूक कमी होत आहे, अशा स्थितीत व्याज दर आणखी वाढल्यास शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढू शकतो. शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्यास सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार कोसळल्यास गुंतवणुकदारांना कोट्यवधीचा फटका बसू शकतो. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याज दरात 50 बेसीस पॉईंटची वाढ करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रुपयामध्ये घसरण होणार
अमेरिकेने व्याज दर वाढवल्यास रुपयाच्या मूल्यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. आधीच रुपयाचे मूल्य प्रति डॉलर 78 रुपयांवर पोहोचले आहे. व्याज दर वाढल्यास रुपयांचे मूल्य आणखी कमी होणार आहे. रुपया घसरल्यास भारतात महागाईचा दर वाढू शकतो, तसेच याचा परिणाम हा भारतात असलेल्या विदेशी गंगजळीवर देखील होऊ शकतो. आरबीआयचे गर्व्हरन शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच भारतात महागाई वाढण्याचे संकेत दिले आहेत.