Infosys च्या कर्मचाऱ्यांनी केला भांगडा; देशातील दिग्गज आयटी कंपनीने केले तरी काय
Infosys Share : आयटी क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. कर्मचारी कपातीचे वृत्त सातत्याने येत आहे, अशा कंपन्यांना देशातील दिग्गज आयटी कंपनी Infosys ने आरसा दाखवला आहे. इन्फोसिसच्या एका निर्णयामुळे कर्मचारी मालामाल झाले आहे. कर्मचाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.
दिवाळीत अनेक कंपन्या, उद्योगसमूह कंपन्यांना बोनस वाटप करतात. तर काहीजण कार, दुचाकी इतकंच नाही तर फ्लॅट सुद्धा गिफ्ट देतात. या कंपन्यांची आणि मालकांचे कौतुक करण्यात येते. पण देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी Infosys ने कर्मचाऱ्यांना ऐन उन्हाळ्यात जोरदार गिफ्ट दिले आहे. ही वार्ता ऐकून कर्मचाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. या शानदार भेटवस्तूमुळे कर्मचाऱ्यांना आकाश ठेंगणे झाले आहे. तुम्ही म्हणाल काय गिफ्ट दिले इन्फोसिसने?
कर्मचाऱ्यांना 95 कोटींचे शेअर
इन्फोसिसने या गिफ्टची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीने शुक्रवारी बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, या तिमाहीत जोरदार कामगिरी बजावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये 6.57 लाख शेअर वितरीत करण्यात आले आहे. या 1 मे रोजी कंपनीने जोरदार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नशीब उघडले. त्यांच्या डीमॅट खात्यात शेअर जमा करण्यात आले. 1 मे रोजी कंपनीचा एक शेअर 1430 रुपयांच्या जवळपास होता. शेअरने वितरीत केलेल्या शेअरची किंमत जवळपास 95 कोटी रुपये आहे.
प्रोत्साहन म्हणून दिले शेअर
अनेक कंपन्या दमदार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस, पगारवाढ अथवा इतर काही गिफ्ट देतात. तर काही काही कंपन्या शेअरचे वाटप करतात. त्यामुळे कंपनीविषयीचा जिव्हाळा वाढतो. कर्मचाऱ्यांची कंपनीतील मालकी वाढते. इन्फोसिसने पण आता हेच पाऊल टाकले आहे. कर्मचाऱ्यांना मोठी हिस्सेदारी दिली आहे.
या दोन योजनेत शेअर वाटप
कर्मचाऱ्यांमध्ये 6.57 लाख शेअर वाटप करण्यात आले. त्यातील 3 लाख 41 हजार 402 शेअर 2015 इन्सेटिव्ह कंपनसेशन योजनेतंर्गत वाटप करण्यात आले. तर 3 लाख 15 हजार 926 शेअरचे वाटप 2019 मधील इन्फोसिस एक्सपँडेड स्टॉक ओनरशिप कार्यक्रमातंर्गत करण्यात आले.
शेअर 52-आठवड्यातील निच्चांकावर
TCS नंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसला मार्च तिमाहीत 7,975 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर कंपनीचा एकूण महसूल 37,923 कोटी रुपये आहे. शुक्रवारी हा शेअर थोडा मजबूत होत 1,415.75 रुपयांवर बंद झाला. इन्फोसिसच्या 52-आठवड्यातील उच्चांक 1,733 रुपयांच्या तुलनेत हा शेअर 18.30 टक्के खाली घसरला आहे. तर या वर्षात या शेअरमध्ये 9 टक्क्यांची घसरण आली आहे.