Investment advice : कमी वयात गुंतवणूक सुरू करा; निवृत्तीनंतरच आयुष्य मजेत जगा, समजून घ्या चक्रवाढ व्याजाची जादू
निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू नये, यासाठी कमी वयात गुंतवणूक (Investment) सुरू करणं हा सर्वात चांगला पर्याय आहे. यावर सर्व आर्थिक तज्ज्ञांचही एकमत आहे.
निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू नये, यासाठी कमी वयात गुंतवणूक (Investment) सुरू करणं हा सर्वात चांगला पर्याय आहे. यावर सर्व आर्थिक तज्ज्ञांचही एकमत आहे. हा सल्ला खरंच मोलाचा आहे. निवृत्तीसाठी (retirement) वर्षानुवर्षे गुंतवणूक केली पाहिजे असं नाही. काही लोक लवकर गुंतवणूक सुरू करून मध्येच गुंतवणूक करणं थांबवतात, तरीही ते दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांपेक्षा जास्त रक्कम उभी करतात. मुळात, एखादी गुतवणूक दीर्घ कालावधीसाठी केली जाते त्यावेळी चक्रवाढीचा फायदा कामाला येतो. चला तर चक्रवाढ व्याजाची जादू समजून घेऊयात. सीता आणि गिता या दोन्ही सख्या बहिणी आहेत. सीतानं 18 व्या वर्षापासून म्युच्युअल फंडात (mutual funds) वर्षाला 50 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 26 व्या वर्षी गुंतवणूक बंद केली. अशाप्रकारे सीतानं आठ वर्षांत चार लाख रुपयांची गुंतवणूक केली. सीताच्या गुंतवणुकीवर वार्षिक 15 टक्के परतावा मिळाला असं गृहित धरा. सीता 40 वर्षांची झाल्यानंतर वार्षिक 15 टक्क्याप्रमाणं तिच्या फंडाची किंमत 55.85 लाख रुपये होते. सीता 50 वर्षांची झाल्यानंतर चक्रवाढीच्या जादूमुळे सव्वा दोन कोटी आणि 60 व्या वर्षी फंडाची किंमत 12 कोटी आठ लाख रुपये होते.
निवृत्तीचं नियोजन वेळेत करा
आता गीताच्या गुंतवणुकीकडे पाहुयात. गीतानं 50 हजार रुपये 25 व्या वर्षी गुंतवण्यास सुरुवात केली. 63 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यास 38 वर्षांत एकूण 19 लाख रुपये गुंतवणूक केली. ज्यावेळी गीता चाळीस वर्षाची होईल त्यावेळी वार्षिक 15 टक्के परताव्याप्रमाणं तिच्या फंडची किंमत 27.82 लाख रुपये होते. गीता ज्यावेळी 50 वर्षाची होईल त्यावेळी ही रक्कम वाढून 1.22 कोटी आणि 60 व्या वर्षात 6 कोटी 71 लाख रुपये होणार आहे. वयाच्या 58 ते 60 वर्षापर्यंत नोकरीमधून उत्पन्न मिळू शकते. आजकाल सर्व आरोग्य सेवा उपलब्ध असल्यानं आयुष्यमान वाढलंय. आरोग्य सेवेमुळे लोकं 80 वर्षापर्यंत ठणठणीत असतात. त्यामुळे निवृत्तीसाठी मोठ्या रक्कमेची गरज आहे. निवृत्तीसाठी शक्य होईल तेवढ्या लवकर गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजदराचा मोठा फायदा होतो. माणूस हा फक्त दिवसाच कमावतो. पैसा मात्र तुमच्यासाठी दिवसरात्र कमावत असतो. त्यामुळे निवृत्तीचं नियोजन वेळेतच करावं असा सल्ला कर सल्लागार आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांनी दिलाय.
रिटायरमेंट प्लॅनिंग
सीता आणि गीताच्या उदाहरणावरून लवकरात लवकर निवृत्तीचं नियोजन करावं हे आपल्याला समजतं. यााठी लवकरात लवकर गुंतवणुकीचा श्रीगणेशा करणं गरजेचं आहे. मध्येच तुमच्या गुंतवणुकीत खंड पडला तरीही दीर्घकाळात चक्रवाढ व्याजामुळे तुम्ही मोठा फंड उभारू शकता. तुम्हाला गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये म्युच्युअल फंड, शेअर मार्केट यासारखे अनेक पर्याय आहे. जर तुम्हाला जास्त जोखीम न घेता गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही बँक तसेच पोस्टाच्या विविध योजनेमध्ये देखील पैसे गुंतवू शकता.