Investment in shares : अधिक चांगला परतावा देणारे शेअर्स कसे निवडावेत? जाणून घ्या टॉप डाउन, बॉटम अप रणनितीबाबत
सहसा नवखे गुंतवणूकदार (Investors) बॉटम अप स्ट्रॅटजी निवडतात. कंपनीचा आर्थिक पाया मजबूत असणाऱ्या कंपनीची निवड करतात. तसेच शेअर्सची खरेदी केल्यानंतर ट्रेडिंग न करता, होल्ड करतात.
पुण्यात (pune) राहणारी पूजा एका आयटी (IT) कंपनीत काम करते. एकटीच राहत असल्याने तिचा खर्च खूप कमी आहे. पैसे वाचतात त्यामुळे तिने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचे (Investment in shares) ठरवले. त्याबद्दल तिने माहिती मिळवण्यास सुरुवात केली. परंतु चांगले शेअर कसे निवडायचे? हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. यावेळी टॉप डाउन आणि बॉटम अप स्ट्रॅटेजीबद्दल तिनं माहिती घेतली. पण तिला समजले नाही. यासाठी तिने आर्थिक सल्लागार असलेला मित्र हितेश सोबत बोलायचे ठरवले. हितेशने याबद्दल तिला समजवण्यास सुरुवात केली. शेअर खरेदी करणे सोपे नाही. पण ही रणनीती शेअरची निवड करण्यास खूप मदत करते. यासाठीच टॉप डाउन आणि बॉटम अप हे दोन टूल वापरले जातात. टॉप डाउन एप्रोचमध्ये एका आर्थिक सायकलदरम्यान काही सेक्टर चांगले प्रदर्शन करतात असे गृहित धरले जाते. उदाहरणार्थ जेव्हा अर्थव्यवस्था मजबूत असते तेव्हा बँकांचे शेअर्स चांगली कामगिरी करतात. याप्रमाणे कमी व्याजदरांच्या काळात भांडवली खर्च जास्त लागणाऱ्या क्षेत्रातील शेअर्सची कामगिरी चांगली असते. अशा प्रकारे क्षेत्राची निवड करता येते. देशांतर्गत आणि जागतिक जीडीपी वाढीचा दर, चलनातील चढ-उतार, महागाई, व्याज दर, कमोडिटीच्या किंमतीतील बदल यासारखे मायक्रो इकॉनॉमिक घटक यामध्ये महत्त्वाचे ठरतात.
बॉटम अप अप्रोच
कोणतीही इंडस्ट्री किंवा क्षेत्र चांगले प्रदर्शन करत नसेल तर त्या क्षेत्रातील सर्वच कंपन्यांची कामगिरी खराब नसते. एखादी कंपनी वेगळ्या मार्गाचा अवलंब करत चांगलं प्रदर्शन करू शकते. या अप्रोचचा वापर करून एखादी कंपनी निवडण्यासाठी मोठी समीक्षा करावी लागते. यात एखाद्या कंपनीचं व्यवस्थापन किती सक्षम आहे? तसेच त्याची भांडवल वापरण्याची क्षमता किती आहे हे पाहिलं जातं.
नेमकी कोणती स्ट्रॅटेजी निवडावी
सहसा नवखे गुंतवणूकदार बॉटम अप स्ट्रॅटजी निवडतात. कंपनीचा आर्थिक पाया मजबूत असणाऱ्या कंपनीची निवड करतात. तसेच शेअर्सची खरेदी केल्यानंतर ट्रेडिंग न करता, होल्ड करतात. टॉप डाऊन असो किंवा बॉटम अप या दोन्ही स्ट्रॅटेजीचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. टॉप डाउन अप्रोचमधून एखाद्या देशात गुंतवणुकीसाठी कशी परिस्थिती आहे याचं व्यापक चित्र समोर येतं. तसेच बॉटम अपच्या माध्यमातून चांगल्या वाढीची आणि चांगल्या मूल्यांकन असणाऱ्या विविध कंपन्यांची निवड करण्यात मदत होते. प्रत्येक अप्रोचमध्ये काही घटक गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहेत तर काही उपयुक्त नाहीत. त्यामुळेच अनेक गुंतवणूक सल्लागार संमिश्र स्ट्रॅटेजी वापरण्याचा सल्ला देतात. एकूणच तुमच्या पसंतीला उतरणाऱ्या अप्रोचची निवड करताना योग्य ते संतुलन ठेवा. शेअर्सची निवड करताना कोणत्या अप्रोचचा वापर करावा याबाबत तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.