आता या स्वस्त आयपीओची चर्चा, गुंतवणूकदारांनी टाकला डाव, गुंतवणूकीचा अजून मौका
IPO Investment | Net Avenue Technologies च्या आयपीओची बाजारात जोरदार चर्चा रंगली आहे. गुंतवणूकदारांनी ग्रे मार्केटचा अंदाज घेत या आयपीओवर डाव टाकला आहे. अनेकांना टाटा आणि नंतर आलेल्या आयपीओत गुंतवणूक करण्याची संधी मिळाली नाही. ती जागा या आयपीओने भरून काढली. गुंतवणूकदारांच्या या स्वस्त आयपीओवर उड्या पडल्या.
नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2023 : नेट एव्हन्यू टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बाजारात चर्चेत आला आहे. काही दिवसांत आलेल्या सर्व आयपीओंनी कमाल केली. त्यांनी बाजार गाजवला. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओने तर मोठी खेळी खेळली. अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. पण अनेकांना इच्छा असूनही आयपीओचा लॉट काही खरेदी करता आला नाही. आयपीओ त्यांच्या नावे अलॉट झाला नाही. अशा संधी गमावलेल्या गुंतवणूकदारांनी नेट एव्हन्यू टेक्नॉलॉजीजची संधी लागलीच हेरली. त्यांनी ग्रे मार्केटचा मागोवा घेतला. या स्वस्तातील आयपीओवर त्यांनी डाव लावला. मोठ्या प्रमाणात या आयपीओमध्ये गुंतवणूक झाली आहे. आयपीओ दुसऱ्या दिवशी 54 पट सब्सक्राईब झाला. कंपनीचा आयपीओ प्राईस बँड 16 रुपयांहून 18 रुपये प्रति शेअर झाला.
1 डिसेंबर रोजी उघडला आयपीओ
नेट एव्हन्यू टेक्नॉलॉजीज आयपीओ 1 डिसेंबर रोजी बाजारात दाखल झाला. यामध्ये गुंतवणूकदारांना 4 डिसेंबर म्हणजे येत्या सोमवारपर्यंत गुंतवणूक करता येईल. पहिल्याच दिवशी या आयपीओचा SME केवळ 14 पट सब्सक्राईब झाला. तर दुसऱ्या दिवशी हा आयपीओ 54 पट सब्सक्राईब झाला. 2 डिसेंबर रोजी रिटेल सेक्शनमध्ये 89.41 पट सब्सक्रिप्शन मिळाले.
8000 शेअरचा एक लॉट
कंपनीने आयपीओसाठी 8000 शेअरचा एक लॉट तयार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमीत कमी 1,44,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागत आहे. सामान्य वर्गवारीत कोणत्याही गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त एकाच लॉटवर डाव लावता येईल. नेट एव्हन्यू टेक्नॉलॉजीज आयपीओने एंकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 2.91 कोटी रुपये जमा केले आहे.
ग्रे मार्केटमध्ये धुमशान
टॉप शेअर ब्रोकरच्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओ 7 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. त्यामुळे शेअर बाजारात कंपनी सूचीबद्ध होताना हा शेअर 38 टक्के प्रीमियमसह उसळी घेण्याची शक्यता आहे. या आयपीओची साईज 10.25 कोटी रुपये आहे. त्यामधील 56.96 लाख शेअर फ्रेश इश्यू करण्यात येत आहे. गुंतवणूकदारांना आता 7 डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यात शेअर जमा होतील की नाही, हे समजेल. NSE वर 12 डिसेंबर रोजी कंपनीची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.