अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात SEBI चा तपास संपला? सुप्रीम कोर्टासमोर मांडले हे मुद्दे
Gautam Adani SEBI | गौतम अदानी आणि अदानी समूहासाठी हे वर्ष अत्यंत त्रासदायक होते. जानेवारी 2023 पासून ते वादात अडकले होते. हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर अनियमिततेचा आरोप लावला होता. हिंडनबर्गनुसार अदानी समूहाने त्यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठा उलटफेर केला आहे. त्यामुळेच हे शेअर उच्चांकावर पोहचल्याचा आरोप त्यांनी केला होता.
नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : गौतम अदानी आणि अदानी समूहाविरोधातील सेबीचा तपास संपला का? असा सवाल आता समोर येत आहे. सुप्रीम कोर्टातील सेबीची भूमिका कारणीभूत त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. शुक्रवारी अदानी-हिडनबर्ग प्रकरणात सेबीने तपास करण्यासाठी कालावधी वाढवून मागितला नाही. अथवा याप्रकरणात अधिक तपासाचा कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही. यापूर्वी सेबीने तपासासाठी कालावधी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सेबीने याप्रकरणात 24 तपासांपैकी 22 तपासांचा अहवाल सादर केला. तर दोन अंतरिम रिपोर्ट अगोदरच मांडले आहेत. यापूर्वी या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली होती.
सेबीवर प्रश्नांच्या फैरी
शुक्रवारी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सेबीला तपासाबाबत प्रश्न विचारले. सेबी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीविषयी काय करत आहे, पैशांच्या सुरक्षिततेविषयी सेबी सजग आहे का, असा सवाल विचारण्यात आला. शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आहे. अशावेळी गुंतवणूकदारांना या अस्थिरतेपासून वाचविण्यासाठी काही उपाय करण्यात आले की नाही, असा प्रश्न सेबीला विचारण्यात आला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सेबीची बाजू मांडली. अशा शॉर्ट-सेलर्सविरोधात कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेअर बाजाराचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित केल्याचे त्यांनी सांगितले.
काय होते प्रकरण
गौतम अदानी आणि अदानी समूहाविरोधात जानेवारी 2023 मध्ये आरोपांची राळ उडाली होती. अमेरिकेची शॉर्टसेलर संस्था हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनियमिततेचे आरोप लावले होते. त्यात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. केंद्र सरकार त्यांना वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. तर इकडे आरोपानंतर अदानी समूहाचे शेअर धडाधड कोसळत होते. कंपनीने अनेक शेअरमध्ये गडबड केल्याचा आरोप हिंडनबर्गने केला होता. अदानी समूहाने हा आरोप फेटाळला.
कंपनीला 150 अब्ज डॉलरचा फटका
हा रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी विक्रीचे सत्र आरंभिले. कंपनीचे मार्केट कॅप झपाट्याने खाली आले. त्यावेळी कंपनीचे बाजारातील भांडवल 150 अब्ज डॉलरने घसरले. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. न्यायालयाने तपासासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित केली. गेल्या काही दिवसांत अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर चांगली कामगिरी बजावत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सूटकेचा निश्वास टाकला आहे.