Israel-Hamas War | युद्धातच का चमकते सोने, किंमती घेतात रॉकेट भरारी
Israel-Hamas War | युद्धाच्या काळातच सोने आणि चांदीला का चेव येतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. युद्ध भडकले तर ते दोन देशात असते, मग त्याचा परिणाम जगातील सोन्यावर का बरं होतो. देशातील सराफा बाजारात त्याचे पडसाद का उमटतात. का वाढतात सोन्याच्या किंमती, का सोने घेते एकदम उसळी, कारण तरी काय?
नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सोने हे सुख संपत्तीचे प्रतिक मानण्यात येते. ते काही एकाच संस्कृतीत नाही तर पृथ्वीतलावरील जवळपास सर्वच समाजात सोने खरेदी हे शुभ मानण्यात येते. ते संपत्ती सोबतच मजबूत आर्थिक स्थितीचे पण संकेत देणारे आहे. त्यामुळे सोन्याला पूर्वीपासूनच श्रीमंतींचा मोठेपणा मिळाला आहे. हा धातू मौल्यवान मानण्यात आला आहे. युक्रेन-रशिया युद्धानंतर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. आता गेल्या आठवड्यापासून इस्त्राईल-हमास युद्धाने पुन्हा सोन्याला सुगीचे दिवस आले आहेत. किंमतीत झरझर वाढ झाली आहे. भारतीय सराफा बाजारात तर सोने चमकले आहे.
आठवडाभरात उंचावल्या किंमती
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) किंमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार एका आठवड्यात सोन्यात 1800 रुपयांची तर चांदीमध्ये 2500 रुपयांची वृद्धी झाली. 6 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,555 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर या 13 ऑक्टोबर रोजी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,396 रुपये होता. या किंमती 1,841 रुपयांनी वधारल्या. चांदीचा भाव 67,204 रुपयांहून 69,731 रुपयांवर पोहचला. चांदी एका किलोमागे 2,527 रुपयांनी वाढली आहे.
वायदे बाजारात काय स्थिती
वायदे बाजारात पण सोने चमकले आहे. 13 ऑक्टोबर रोजी पिवळ्या धातूत 1497 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. डिसेंबर महिन्यातील फ्युचर कॉन्ट्रक्टवर नजर टाकल्यास एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत 2.58% दरवाढ दिसून आली. भाव 59,415 रुपये प्रति ग्रॅमवर पोहचला आहे. भाव आणखी तेजीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
रशिया-युक्रेन युद्ध
रशिया-युक्रेन युद्धावेळी पण किंमती भडकल्या होत्या. रशिया युक्रेन युद्धाला 24 फेब्रुवारी 2022 रोजी तोंड फुटले. 7 मार्च 2022 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 1000 रुपयांनी वधारले होते. त्यावेळी 22 कॅरेट सोने 49,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर 24 कॅरेट सोने 53,890 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.
काय आहेत कारणं
- सोने म्हणजे जणू विमाच- कोट्यवधी गुंतवणूकदार, ग्राहक, व्यापारी, व्यावसायिक, मोठ्या संस्था, मध्यवर्ती, केंद्रीय बँका, सरकारं सोन्यात मोठी गुंतवणूक करतात. कारण सोने म्हणजे एक प्रकारचा विमाच असतो. जो अडचणीच्या काळात उपयोगी पडतो.
- सोन्यावर मोठा भरवसा- सर्वसामान्यच नाही तर सरकारचा सुद्धा सोन्यावर सर्वाधिक विश्वास आहे. सोन्यातील गुंतवणूक ही कायम फायदेशीर मानण्यात येते. सोन्याचा परताव्याचे गणित यामागे दडलेले आहे. पूर्वीच्या काळात शेअर बाजार नव्हते. त्यावेळी सोने हाच मौल्यवान धातू होता. तो सर्वाधिक परतावा देत असे.
- युद्ध काळात जमवाजमव- अनेक देश युद्धाच्या वातावरणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवतात. भविष्यात आपली पत दाखवण्यासाठी आजही अनेक देशांना सोन्याचा उपयोग होतो. भारताने काही टन सोने गहाण ठेवले होते, हे अनेकांना माहिती असेलच. या सर्व कारणांमुळे सोने भाव खाऊन जाते.