नवी दिल्ली- जागतिक अर्थपटलावरील घडामोडींचा भारतीय बाजारपेठेवर (INDIAN SHARE MARKET) मोठा परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे तेजी-घसरणीचं चित्र दिसून येत आहे. बाजार अस्थिरतेमुळं गुंतवणुकदारांचा कल सोने गुंतवणुकीकडे (GOLD INVESTMENT) पाहायला मिळाला. गेल्या तीन महिन्यांच्या भावाच्या तुलनेत आज (सोमवारी) सोन्याच्या भावानं उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत (MAJOR CITIES GOLD RATE) सोन्याच्या भावानं प्रति तोळा पन्नास हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 46250 आणि 24 कॅरेट सोन्याला 50450 रुपये भाव मिळाला. तर मुंबईखालोखाल पुण्यानं 50 हजारांचा टप्पा गाठला. पुण्यात 22 कॅरेट सोन्याला 46329 आणि 24 कॅरेट सोन्याला 50520 रुपये भाव मिळाला.
मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 रुपयांच्या वाढीसह 49,960 रुपयांवर पोहोचली. गेल्या तीन महिन्यांपासून सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. आजच्या व्यवहाराच्या दरम्यान सोन्याला 49,930 रुपये भाव मिळाला आणि दिवसभराच्या व्यवहारदरम्यान फ्युचर्सची किंमत 0.17 टक्क्यांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 49,960 रुपयांवर पोहोचली.
· अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यामुळे महागाई वाढीचे संकेत
· अमेरिका, युरोपसह जागतिक शेअर बाजार आर्थिक दबावात
· वाढत्या महागाईमुळे शेअरबाजारातून पैशांचा ओघ
· सोने खरेदीकडं सुरक्षित गुंतवणुकीचं साधन म्हणून दृष्टीकोन
· लग्नसराई व प्रमुख मुहुर्तामुळे भारतात वाढत्या सोने खरेदीला मागणी
गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या घसरणीचा परिणामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 241.34 लाख कोटी रुपयांची घसरण झाली होती. गेल्या आठवड्यात आठवड्याच्या अखरेच्या दिवशी मार्केट कॅप 255.17 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर होता. एका आठवड्यात गुंतवणुकदारांना एकूण 13.83 लाख कोटींवर पाणी सोडावं लागलं होतं. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2042 अंक (3.72%) घसरण नोंदविली गेली. तर निफ्टी 629 अंक (3.83%) टक्क्यांची घसरण झाली.