Insurance : विमा खरेदीसाठी KYC अनिवार्य, का झाला नियमांत बदल? घ्या जाणून एका क्लिकवर
Insurance : विमा खरेदीसाठी आता केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्षात, 2023 मध्ये विमाधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता विमा पॉलिसी खरेदी (Insurance Policy) करण्यासाठी केवायसी अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) आरोग्य, ऑटो आणि घर इत्यादी विमा खरेदी करत असाल तर तुम्हाला केवायसी अपडेट करावे लागेल. नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठीही केवायसीचे मापदंड (KYC Norms Mandatory) पूर्ण करावे लागतील. जीवन, सर्वसाधारण आणि आरोग्य विमा घेण्यासाठी हा नियम लागू असेल. यापूर्वी केवायसी अपडेट करणे अनिवार्य नव्हते. तर ही ऐच्छिक प्रक्रिया होती. पण आता विमाधारकाला त्याच्या पॉलिसीसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड आणि आवश्यक दस्ताऐवजाच्या सत्यप्रती जोडाव्या लागतील.
या नियमांमुळे आता विमा दाव्यांचा निपटारा करणे सुलभ होणार आहे. तज्ज्ञांच्या मते दावा निपटाऱ्याची प्रक्रिया या नियमामुळे गतीमान होईल. कारण आता विमा कंपनीकडे ग्राहकाची सर्व अद्ययावत माहिती असेल. केवायसी नियमामुळे बोगस क्लेमची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच योग्य व्यक्तीलाच दाव्याची रक्कम मिळले.
एका वृत्तातील दाव्यानुसार, IRDAI ने एक महत्वपूर्ण प्रस्ताव ठेवला आहे. ज्यांनी कोविड काळात लसीचे दोन डोस आणि बुस्टर डोस घेतला आहे. त्यांच्यासाठी विमा पॉलिसीवर सवलत देण्याचा विचार करण्याचा आग्रह धरला आहे. पीटीआयच्या दाव्यानुसार, कोविडसंबंधीत जीवन आणि इतर विमा पॉलिसींचा दावा पटकन निकाली काढण्यासही सांगण्यात आले आहे.
नियामक प्राधिकरणाने विमाधारकाला कोविड काळात उपचारासंबंधीचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याची प्रक्रिया राबविण्याचे सांगण्यात आले आहे. कोविड काळातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी एक वॉर रुम तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
IRDAI च्या अहवालानुसार, विमा कंपन्यांनी कोविड काळातील 2.25 लाखांहून अधिक मृत्यू दावे निकाली काढले होते. पण दुसऱ्या लाटेतील विमा पॉलिसीचे दावे निकाली काढण्यासाठी विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.