नवी दिल्ली : तुम्हाला बहुचर्चित एलआयसी आयपीओत शेअर्स वितरीत (अलॉट) झाले नाहीत? चिंता करू नका. तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या कंपनीत गुंतवणुकीची कवाडं अद्यापही खुली आहेत.तुम्ही अजूनही एलआयसीचे शेअर्स (LIC SHARES) स्वस्तात खरेदी करू शकतात. येत्या 17 मे (मंगळवारी) एलआयसीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) होण्याची शक्यता आहे. समान दिवशी शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्ससाठी ट्रेंडिंग सुरू होईल. म्हणजेच तुम्ही दोन दिवसानंतर एलआयसी शेअर्सची खरेदी-विक्री करू शकतात. तुम्ही विचारात असाल की एलआयसीचा शेअर स्वस्तात कशा उपलब्ध होईल? त्याचं गणित आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. एलआयसीने शेअरचा इश्यू प्राईस (ISSUE PRICE) 949 रुपये निश्चित केला आहे. शेअर वितरित झालेल्या प्रत्येकाला शेअर 949 रुपयांत उपलब्ध असेल. दरम्यान, ग्रे मार्केट मध्ये एलआयसी शेअरची किंमत इश्यू प्राईसपेक्षा निश्चितच कमी आहे. एलआयसी आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम (GREY MARKET PREMIUM) 0 ते 18 रुपयांपेक्षा कमी आहे. ओपन मार्केटमध्ये एलआयसीचा शेअर 18 रुपये सवलतीसह लिस्ट होऊ शकतो.
भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा बहुचर्चित एलआयसी आयपीओला फटका बसला आहे. बाजारमूल्य कंपनीच्या एकूण समभागाच्या 5 ते 3.5 टक्क्यांनी कपात करण्यात आले. त्यामुळे एलआयसी शेअरची किंमत मूळ किंमतीपेक्षा घटली होती.
जागतिक गुंतवणुकदारांना आकर्षिक करण्यासाठी एलआयसीनं धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. दरम्यान, प्री-प्लेसमेंटच्या माध्यमातून एलआयसी आयपीओला अँकर इन्व्हेस्टरचा बंपर प्रतिसाद मिळाला आहे. अर्थक्षेत्रातील जाणकरांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी आयपीओत अँकर इन्व्हेस्टरने 7000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. एलआयसीनं जागतिक स्तरावरील अँकर इन्व्हेस्टरला निमंत्रण धाडली होती. त्यांच्या माध्यमातून 5630 कोटी रुपये उभारणीचे एलआयसीचं उद्दिष्ट होतं. अपेक्षेपेक्षा अधिक गुंतवणूक एलआयसीच्या खात्यात जमा झाली आहे. केंद्र सरकारने एलआयसी आयपीओ साठी 50-60 अँकर इन्व्हेस्टर्सची निवड केली होती.
• आयपीओच्या माध्यमातून सरकार एलआयसीतील 3.5 टक्के भागीदारी विकणार
• पॉलिसी धारकांना 60 रुपये आणि रिटेल आणि कर्मचाऱ्यांना 45 रुपयांचा डिस्काउंट
• आयपीओचा लॉट साईझ 15 शेअर्सचा
• एलआयसीने आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राईस ब्रँड निश्चित
• आयपीओच्या माध्यमातून 22 कोटींहून अधिक शेअर्सची विक्रीचं लक्ष्य
• अँकर गुंतवणुकदारांसाठी 5.9 कोटी, कर्मचाऱ्यांसाठी 15.8 लाख, पॉलिसीधारकांसाठी 2.2 कोटी शेअर