मजूर झाले करोडपती; 1337 रुपयांचे शेअर दिले केवळ 4 रुपयांत, ही कंपनी आहे तरी कोणती?
Lloyds Metals and Energy Limited Company : महाराष्ट्रातील गडचिरोली येथील कंपनीने कर्मचारी, मजूर लक्षाधीश, कोट्याधीश झाले आहे. या कंपनीने 1337 रुपये किंमतींचे शेअर त्यांना अवघ्या 4 रुपयांना दिला आहे. 6000 मजूरांना नव वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे.
राज्यातील गडचिरोली येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडने ( LMEL) त्यांच्या जवळपास 6000 मजूरांना नव वर्षाचे गिफ्ट दिले. या कंपनीने कर्मचाऱ्यांसह मजूरांना 1337 रुपये किंमतीचे शेअर अवघ्या 4 रुपयांना दिले आहेत. चंद्रपूर, गडचिरोली हा भाग नक्षलग्रस्त आहे. हे जिल्हे विदर्भात येतात. याठिकाणी खाणी आणि विपुल वनसंपदा आहे. LMEL कडे या भागात लोखंडाची खाण आणि एक स्टील उत्पादन प्रकल्प आहे. या भागातील हजारो तरुणांना कंपनीने रोजगार पुरवला आहे.
मजूरांना कंपनीचे धमाकेदार गिफ्ट
TOI च्या वृत्तानुसार, कंपनीने जवळपास 6000 मजूरांना नवीन वर्षात धमाकेदार गिफ्ट दिले. स्वस्तात शेअर मिळणाऱ्यांमध्ये 80 टक्के हे खाणीत काम करणारे मजूर आहेत. त्यांना कंपनीने या वर्षाच्या पहिल्या दिवशी 1,337 रुपयांहून अधिक मूल्यांचे शेअर अवघ्या 4 रुपयांना दिले आहे. हे मजूर, येथील कर्मचारी हे जिल्ह्यातील आदिवासी भागातील आहे. त्यातील काही जणांनी नक्षली चळवळीत काम केले होते. त्यांनी शस्त्र खाली ठेवत सर्वसामान्य आयुष्य स्वीकारले आहे. ते उदरनिर्वाहसाठी या कंपनीत काम करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी वाटले शेअर पत्र
कंपनीने आपल्या मजूरांना हे शेअर देण्यासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यांनी LMEL च्या ओडिशा युनिटमधील आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तुलसी मुंडा आणि दोन आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना शेअर सर्टिफिकेट दिले. तुलसी मुंडा यांना कंपनीने जवळपास 1 कोटी 30 लाख किंमतीचे 10,000 शेअर दिले.
तुम्ही आता कंपनीचे मालक -देवेंद्र फडणवीस
शेअर वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार मांडले. आता तुम्ही कंपनीचे मालक झाला आहात, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी यावेळी कंपनीचे व्यवस्थापक बी. प्रभाकरन यांचे कौतुक केले. त्यांनी अशा भागात खान सुरू केल्याचे धारिष्ट्य दाखवल्याचे ते म्हणाले. पूर्वी या भागात कोणीच येत नव्हते, असे ते म्हणाले. तुम्ही आता पाच वर्षे थांबलात, हे शेअर तसेच ठेवले तर तुम्हाला पाच पट परतावा मिळेल. प्रभाकरन हे व्यवस्थापक आहेत तर तुम्ही आता कंपनीचे मालक आहात, असे फडणवीस या मंजूरांना संबोधित करताना म्हणाले.
ज्या कामगारांना कंपनीत दोन वर्षे झाली आहेत, त्यांना 100 शेअर देण्यात आले. तर इतर कर्मचाऱ्यांना जास्त शेअर देण्यात आले. या शेअरसाठी कोणताही लॉक-इन कालावधी नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मजूरांच्या भविष्याची तरतूद झाली आहे.