नातीसमोर तर सर्व श्रीमंती फिक्की; गौतम अदानी झाले हळवे
देशातील अदानी उद्योगसमूह मोठा आहे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यानंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत म्हणून गौतम अदानी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी नातीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रावरील फोटो ओळीने सर्वांचे मन वेधून घेतले आहे.
भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी अदानी ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन गौतम अदानी यांना गेल्या वर्षी मोठ्या तुफानाचा सामना करावा लागला. त्यांचे ग्रहच जणू फिरले होते. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गच्या आरोपानंतर भारतीय उद्योगसमूह ढवळून निघाला. अदानी समूहाच्या अनेक शेअरमधून गुंतवणूकदारांनी अंग काढले. त्याचा मोठा फटका बसला. पण आता या समूहाच्या मानगुटीवरुन हे भूत उतरले आहे. हा समूह मोठी उलाढाल करत आहे. गौतम अदानी यांनी त्यांच्या नातीसोबतचा फोटो समाज माध्यमांवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी आपल्या नातीविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अदानी झाले भावूक
- समाज माध्यमांवर त्यांनी नातीसोबतच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते नात कावेरीसोबत दिसत आहेत. कावेरी सध्या 14 महिन्यांची आहे. गौतम अदानी यांनी नातीला उचलून घेतले आहे. हे छायाचित्र 21 मार्च रोजी लंडनमधील सायन्स म्युझियममधील न्यू अदानी ग्रीन एनर्जी गॅलरीत घेण्यात आले आहेत. कावेरी ही त्यांची सर्वात धाकटी नात आहे. करण आणि परिधी अदानी यांची ती तिसरी कन्या आहे.
- गौतम अदानी अनेक मंचावरुन त्यांचे नातू, नातींविषयीचे किस्से सांगतात. ते कुटुंबवत्सल असल्याचे या फोटोवरुन दिसून येते. एक मोठे उद्योगपती असले तरी ते एक आजोबा आहेत, हे ते विसरलेले नाहीत. नातीच्या हास्याकडे पाहून या हास्यापुढे अवघ्या जगाची श्रीमंत फिक्की असल्याची फोटो ओळ त्यांनी दिली आहे. या डोळ्यांची चमक, हीच खरी श्रीमंती असल्याचे कोडकौतूक त्यांनी केले आहे.
नातवांसोबत वेळ घालवण्याचे सुख
काही वेळेपूर्वी गौतम अदानी यांनी एका कार्यक्रमात, नातवांसोबत वेळ घालणे हे सर्वात मोठे सुख असल्याचे म्हटले होते. आपल्याला नातवंडांमध्ये वेळ घालवायला आवडतो. त्यामुळे कार्यालयीन, उद्योगातील चिंता, थकवा कुठल्या कुठे गायब होतो. माझे केवळ दोनच जग आहे, एक काम आणि एक कुटुंब. माझ्यासाठी कुटुंबाची शक्ती हा मोठा स्त्रोत असल्याचे ते म्हणाले.
इन आँखों की चमक के आगे दुनिया की सारी दौलत फीकी है। 🙏 pic.twitter.com/yd4nyAjDkR
— Gautam Adani (@gautam_adani) April 2, 2024
100 अब्ज डॉलरपेक्षा अधिकची संपत्ती
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यानंतर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, त्यांच्याकडे 102 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. ते जगातील 13 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 2024 मध्ये त्यांच्या संपत्तीत 18.1 अब्ज डॉलरची भर पडली. हिंडनबर्ग वृत्तामुळे 2023 मध्ये या समूहाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर हे मळभ दूर झाले. आता अदानी समूहाने पुन्हा घौडदौड सुरु ठेवली आहे. एका वर्षात या समूहाने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.