LPG Cylinder : सबसिडीची केली थट्टा, सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला, एलपीजी सिलेंडरची 4 वर्षांत 56 टक्के वाढ
LPG Cylinder : या वर्षात पहिल्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पु्न्हा 50 रुपयांची वाढ झाली. गेल्या चार वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतीत 56 टक्के दरवाढ झाली आहे. यापूर्वीच्या किंमतींवर नजर टाकली असता, सध्या हजार रुपयांत सध्या एक गॅस सिलेंडर मिळत आहे. पूर्वी एवढ्याच किंमतीत दोन गॅस सिलेंडर येत होते.
नवी दिल्ली : या वर्षात पहिल्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पु्न्हा 50 रुपयांची वाढ झाली. 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price) आता 1,103 रुपयांपर्यंत पोहचली आहे. गेल्या चार वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतीत 56 टक्के दरवाढ झाली आहे. यापूर्वीच्या किंमतींवर नजर टाकली असता, सध्या हजार रुपयांत सध्या एक गॅस सिलेंडर मिळत आहे. पूर्वी एवढ्याच किंमतीत दोन गॅस सिलेंडर येत होते. 1 एप्रिल, 2019 रोजी घरगुती 14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरची किंमत 706.50 रुपये होती. 2020 मध्ये हा दर 744 रुपये झाला. 2021 मध्ये पुन्हा भावात वृद्धी झाली. गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये झाली. 2022 मध्ये एका गॅस सिलेंडरची किंमत 949.50 रुपये झाली. गेल्या काही वर्षात एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे गॅस सबसिडी (Subsidy on LPG) अत्यंत कमी झाली. चार रुपयांच्या घरात ही रक्कम जमा होत असल्याने सर्वांची थट्टा झाली.
गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने एलपीजीवरील सबसिडी कमी केली. 2018-19 मध्ये 37,209 कोटी रुपये सबसिडी पोटी देण्यात आले होते. 2019-20 मध्ये एलपीजीवरील सबसिडी कमी होऊन ती 24,172 कोटी रुपये झाली. 2020-21 मध्ये 11,896 कोटी रुपये तर 2021-22 मध्ये 1,811 कोटी रुपयांवर सबसिडी येऊन ठेपली. आता ग्राहकांच्या खात्यात अवघे 3.75 रुपयांच्या जवळपास सबसिडी जमा होते.
पेट्रोलियम मंत्रालयानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीं आधारे एलपीजीसहित इतर पेट्रोलियम उत्पादनांचे भाव ठरवण्यात येतात. त्याआधारे या सर्वांच्या किंमती ठरविल्या जातात. सऊदी सीपीच्या सर्वसाधारम किंमतींनुसार हे भाव ठरतात. 2019-20 ते 2021-22 या दरम्यान भाव 454 अमेरिकी डॉलर/एमटी वरुन 693 अमेरिकी डॉलर/एमटी झाले. पेट्रोलियम मंत्रालयाने संसदेत याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, 2022-23 या काळात सऊदी सीपी फेब्रुवारी 2023 पर्यंत युएस डॉलर 710/एमटी पर्यंत वाढला. त्यामुळे देशात गॅसच्या किंमतीत वाढ होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांना घरगुती एलपीजीच्या विक्रीवर खूप नुकसान सहन करावे लागत आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजना (PMUY) 2016 मध्ये गरिब कुटुंबांतील महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेतंर्गत 8 कोटी कनेक्शन देण्यात आले. उज्ज्वला 2.0 अंतर्गत PMUY लाभार्थ्यांना निःशुल्क एलपीजी कनेक्शनसहीत पहिली रिफिल आणि स्टोव्ह पण देण्यात आला. उज्ज्वला योजनेतंर्गत 1 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत 1.6 कोटी कनेक्शन देण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजनेतंर्गत (PMGKP) 1 एप्रिल 2020 रोजी पासून उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना तीन मोफत एलपीजी रिफिल देण्याची घोषणा करण्यात आली.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMC) एलपीजी रिफिल खरेदीसाठी पीएमयुवाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 9670.41 कोटी रुपये हस्तांतरीत केले. पीएमयुवाय लाभार्थ्यांना योजनेतंर्गत 14.17 कोटी रिफिल देण्यात आले. तसेच प्रोत्साहन देण्यासाटी मे 2022 पासून केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी लाभार्थ्यांना एका वर्षात 12 रिफिल पर्यंत गॅस सिलेंडरमध्ये मोठी सवलत दिली. 14.2 किलोग्रॅमचे गॅस सिलेंडर 200 रुपये प्रति नगाने देण्यात आले.
मंत्रालयानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना घरगुती गॅस सिलेंडरच्या विक्रीवर मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हे नुकसान भरुन निघण्यासाठी केंद्र सरकारने तेल कंपन्यांना भलेमोठे अनुदान जाहीर केले आहे. त्यानुसार, या कंपन्यांना एकरक्कमी 22000 कोटी रुपये देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे.