पुण्यातील सध्याचे आघाडीचे स्टार्टअप्स Emotorad वर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याचा जीव जडला आहे. तो या स्टार्टअप्सशी केवळ जोडल्या गेला नाही तर त्याने या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. इमोटोरॅड ही इलेक्ट्रिक सायकलसह इतर इलेक्ट्रिक उत्पादने तयार करण्यात आघाडीवर आहे. आता OLA कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवत या कंपनीने पुण्यात तिची विस्तार योजना आखली आहे. पुण्यात ही कंपनी सर्वात मोठी गीगाफॅक्टरी उभारत आहे. या घडामोडीमुळे भारत ही जगातील दोन सर्वात मोठ्या गीगाफॅक्टरीचे माहेरघर होणार आहे. ओला ईलेक्ट्रिक दुचाकी आणि Emotorad e-cycles या दोन गीगाफॅक्टरीचा मान देशाला मिळाला आहे.
5,00,000 ई-सायकलची क्षमता
इमोटोरॅड कंपनी स्टार्टअप असली तरी तिची उत्पादन क्षमता प्रचंड आहे. एका दाव्यानुसार, वार्षिक 500,000 e-cycles तयार करण्याची क्षमता या कंपनीकडे आहे. कंपनी पुण्यात 240 हजार चौरस फुटावर कंपनीच्या गीगाफॅक्टरीचे काम सुरु आहे. या युनिटमध्ये बॅटरी, मोटर, डिस्प्ले, चार्जर यांची निर्मिती होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही उत्पादनं महत्वाची आहेत. आता वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने प्रकल्प विस्ताराची योजना आखली आहे.
दक्षिण आशियात होणार पुण्याचे नाव
ई-सायकल गीगाफॅक्टरी चार टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्याचे काम सुरु आहे. हा टप्पा पूर्ण होताच दक्षिण आशियात पुणे येथे ही सर्वात मोठी ई-सायकल गीगाफॅक्टरी ठरेल. चीनला पण आपण मागे टाकू. या ऑगस्ट 2024 पासून पहिला टप्पा सुरु होत आहे. त्याची तयारी सुरु आहे. त्यानंतर पुढील टप्पे पूर्ण होतील.
चार वर्षांपूर्वीच स्थापना
Emotorad ची स्थापना चार वर्षांपूर्वीच करण्यात आली आहे. 2020 मध्ये राजीब गंगोपाध्याय, कुणाल गुप्ता, आदित्य ओझा आणि सुमेध बट्टेवार यांनी या कंपनीची स्थापना केली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये या कंपनीला 164 कोटींचा फंडा मिळाला होता. या कंपनीत पंथेरा समूह, Xto10x या समूहासह भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याने मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने भारतात घट्ट पाय रोवल्यानंतर आता युरोप आणि इतर बाजारपेठांवर नजर रोखली आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या ई-सायकलची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या आर्थिक वर्षात कंपनी दुप्पट महसूल मिळविण्याचा अंदाज व्यक्त करत आहे.