सोनं 39 हजारांपर्यंत जाण्याचं कारण काय?
जगभरात आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे सोन्याची किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. भारतात प्रतितोळा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 39 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. भारतात गुरुवारी सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढत होत ते 38 हजार 970 रुपयांपर्यंत पोहचले. सध्या सोन्याची दर आत्तापर्यंतचा सर्वाधिक आहे.
नवी दिल्ली : जगभरात आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे सोन्याची किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. भारतात प्रतितोळा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 39 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. भारतात गुरुवारी सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढत होत ते 38 हजार 970 रुपयांपर्यंत पोहचले. सध्या सोन्याची दर आत्तापर्यंतचा सर्वाधिक आहे. चांदीचा दरही 45 हजार प्रति किलोपर्यंत पोहचला आहे.
सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जाते. त्यामुळे आर्थिक मंदीची स्थिती तयार झाल्यावर गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे बाजारातही सोन्याची मागणी वाढते. मागणी वाढल्याने स्वाभाविकपणे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. घरेलू बाजारात देखील मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यास सोन्याच्या किमतीत वाढ होते. त्यामुळेच दिवाळी सारख्या सणांना किंवा लग्नसराईत सोन्याचे भाव वाढतात. या व्यतिरिक्त सरकारचे निर्णय आणि भूमिका यांचाही सोन्याच्या दरावर थेट परिणाम होतो.
भारतात सोनं महागण्याची कारणं
1. अर्थसंकल्पातील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा
भारतात सोन्याचे दर वाढण्यामागे केंद्र सरकारची अर्थसंकल्पातील सोन्यावरील घोषणा आहे. जुलैत मोदी सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरुन 12.5 टक्के केले आहे. त्यामुळे सोन्याचा व्यापार वेगाने मंदावत आहे.
2. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट
सोन्याचे दर वाढण्यामागील दुसरे मोठे कारण रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये केलेली कपात आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने सोन्याचे भाव वाढल्याचं अनेक अर्थतज्ज्ञ सांगतात.
3. परदेशी गुंतवणुकीवर सरचार्ज
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात परदेशी गुंतवणुकीवर सरचार्ज लावण्याची घोषणा केली. त्यानंतर जुलै महिन्यात भारतातील बाजारात मागील 17 वर्षांची निच्चांकी कामगिरी पाहायला मिळाली. शेअर बाजाराची स्थिती देखील अधिक खराब झाली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.
4. आंतरराष्ट्रीय राजकारणातील संघर्ष
जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु आहे. अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवले आहे. चीनने देखील युआन चलनात गडबड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार काळजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणा सोन्याच्या दरासह आर्थिक विकास दरावरही झालेला पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जागतिक विकासदर 3.5 वरुन 3.3% केला आहे.
सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होणार?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. पुढील काळात दसरा, दिवाळी सारखे मोठे सण येत आहेत. या काळात सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर 40 हजारांचा आकडा पार करु शकतात.