तुमच्या घरातील गारवा महागणार ! AC च्या किंमतीत वाढ; या कारणामुळे वाढणार एसीच्या किंमती
AC Price Hike: लवकरच तुमच्या घरातील गारवा महागणार आहे. थंड हवा खाण्यासाठी एसी खरेदीचा विचार करत असाल तर आता एसीच्या किंमतींमध्ये लवकरच वाढ होणार आहे. 1 जुलैपासून एसीच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामागील कारण काय आहे ते जाणून घेऊयात.
एसीची गार गार हवा कोणाला नको असते ? पण आता हा गारवा तुम्हाला महागात पडणार आहेत. कारण उत्पादकांनी एसीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जुलैपासून ही दरवाढ लागू होणार आहेत. पुढील महिन्यांपासून एसीसंबंधी काही नियमांमध्ये सरकारने बदल केला होता. त्या बदलाची सुरुवात पुढील महिन्यांपासून होत आहे. नियमातील या बदलांनी उत्पादकांना एसीच्या किंमतीत वाढ करण्यास भाग पाडले आहे. BEE- Bureau of Energy Efficiency अर्थात ऊर्जा कार्यक्षमता विभागाने वातानुकूलित यंत्रामध्ये (AC Machine) नवीन ऊर्जा मानांकन नियमावली (Energy Rating Rules) बदलली आहे. त्याचा परिणाम किंमतींवर होणार आहे. हे नियम 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहेत. यापूर्वी हे नियम 1 जानेवारी 2022 रोजी पासून लागू होणार होते. उत्पादकांच्या विनंती नंतर सरकारने कंपन्यांना कालावधी वाढवून दिला होता. त्यानुसार जवळपास सहा महिन्यांची सवलत देण्यात आली होती. आता 30 जून रोजी ही मुदत संपत आहे.
एक स्टार होणार कमी
सरकारने उत्पादक कंपन्यांना नवीन नियम लागू करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून दिला होता. या दरम्यान त्यांना नविन नियमांची माहिती ही देण्यात आली होती. 1 जुलै 2022 रोजी पासून लागू होणा-या नवीन नियमांनुसार, नवीन एनर्जी रेटिंग नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमांनुसार, सध्यस्थितीत एसीत सुरु असलेल्या रेटिंगमध्ये बदलाव करण्यात येईल. या रेटिंगमधील एक स्टार कमी होईल. म्हणजे यापूर्वी 5 स्टार मध्ये मिळणारे एसी आता 4 स्टारमध्ये मिळतील. नियमानुसार, एसीच्या डिझाईनमध्येही बदल करण्यात येणार आहे. नियमानुसार कंपन्यांना आता एअर फ्लो वाढवावा लागणार आहे. तसेच कॉपर ट्यूबचा वरील भागही वाढवावा लागणार आहे. तसेच पूर्ण क्षमतेचा कंप्रेशर द्यावा लागणार आहे.
किती वाढतील किंमती?
अहवालानुसार, नवीन नियमानुसार, एसीच्या किंमतीत उत्पादकांना वाढ केल्याशिवाय पर्याय नाही. आता या किंमती किती वाढतील याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरु होत्या. त्याविषयी चर्चांनाही उधाण आले होते. अनेकांनी किंमतीत लक्षणीय वाढीचा अंदाज पेरला होता. तर एसीच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. वास्तविक हा एक अंदाज आहे, उत्पादकांनी एसीच्या किंमती वाढवण्याची तारीख एक आठवड्यावर आली असतानाही एसीच्या नवीन किंमतीविषयी कसलेही भाष्य केलेले नाही.
तुमच्या एसीची रेटींग संपणार
नवीन नियम 1 जुलै 2022 रोजी पासून लागू होतील. तेव्हापासून यापूर्वीच्या रेटिंगने उत्पादित एसीचे रेटिंग समाप्त होणार आहे. ऊर्जा क्षमतेबाबतची नवीन नियमावली, 1 जुलै 2022 रोजी पासून ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत लागू असेल. त्यानंतर रेटिंग एका स्टारने कमी होईल आणि हेच नियम पुढे सुरु राहतील. त्यामुळे एसी खरेदी करायचा असेल तर 30 जूनपूर्वी खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.