आयएएसची नोकरी सोडून खाजगी क्षेत्र निवडले, बनले टॉप कंपन्याचे सीईओ
सरकारी नोकरी म्हणजे सर्व सवलती, कामाच्या ठराविक वेळा आणि सोयी-सुविधा असे समीकरण असल्याने लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करीत असतात. पण कलेक्टर पदाचा राजीनामा देऊन खाजगी कंपन्यात डंका वाजविणारे विरलच...
नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : युपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाऊन नशीब घडविणारे अनेक जण आहेत. देशातील सर्वात अवघड परीक्षा देण्यासाठी अनेक जण मेडीकल, इंजिनिअरींग आणि खाजगी नोकरीवर पाणी सोडतात. परंतू तुम्ही कलेक्टरची पोस्ट सोडून खाजगी क्षेत्रात नशीब आजविणाऱ्याबद्दल ऐकायला मिळाले आहे का? हो अशाच एका व्यक्ती कहाणी आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी खाजगी नोकरीसाठी कलेक्टरचे पद सोडून दिले.
सरकारी नोकरी म्हणजे सर्व सवलती, कामाच्या ठराविक वेळा आणि सोयी- सुविधा असे समीकरण असल्याने लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करीत असतात. त्यात जर प्रशासकीय सेवा म्हटले की सरकारी बंगला, नोकर-चाकर, सरकारी गाडी असा राजेशाही थाट असतो. त्यासाठी यूपीएससीची देशातील सर्वात अवघड परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. तर अशी यूपीएससी उत्तीर्ण होऊन मिळालेल्या कलेक्टर पदाला त्याग करणाऱ्यांची उदाहरणे खूपच विरलच आहे.
1985 च्या बॅचचे आयएएस
रोहीत मोदी यांनी 14 वर्षांपर्यंत आयएएस अधिकारी राहून काम केल्यानंतर राजीनामा दिला. त्यांनी 14 वर्षे कलेक्टर म्हणून अनेक जागी सेवा केली होती. त्यानंतर त्यांनी खाजगी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले रोहीत मोदी यांनी या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर अनेक प्रायव्हेट कंपन्यात काम केले. एल एण्ड टी, आयडीपीएल, सुजलॉन एनर्जी, गॅमन इंडीया आणि एस्सेल इंफ्रा लिमिटेडमध्ये त्यांनी सीईओ म्हणून काम केले आहे.
असे झाले शिक्षण
रोहीत यांचे शालेय शिक्षण राजस्थानच्या जयपूरात झाले. दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्यूएशन केले. कॉलेजनंतर युपीएससी सिव्हील परीक्षेची तयारी केली. 1985 मध्ये त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. कधी शहरी विकास, कधी कापड, उद्योग, वित्त आणि कोळसा क्षेत्रात काम केले. सर्वकाही सुरळीत असताना त्यांनी सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. साल 1999 मध्ये त्यांनी आयएएस पदाचा राजीनामा दिला.
दुसरी इनिंगही गाजविली
रोहीत मोदी यांनी अचानक आयएएस पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे नातेवाईक, मित्र सगळेच अंचबित झाले. परंतू त्यांनी संपूर्ण तयारी करीत अनेक बड्या खाजगी कंपन्यात टॉप पदावर काम केले. सुजलॉन एनर्जी, महिंद्र इंडस्ट्रीयल पार्क, एल एण्ड टी, आयडीपीएल, तामिळनाडू रोड डेव्हलपमेंट कंपनी, गॅमन इंडीया, रोड इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी ऑफ राजस्थान, एस्सेल इंफ्रा प्रोजेक्ट्स आणि स्मार्ट युटीलिटीज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांनी जोमदार कामगिरी केली.