Richest Indian : श्रीमंतांची कोटीच्या कोटी उड्डाणे! भारतात दोन वर्षांत अशी वाढली संपत्ती
Richest Indian : देशात श्रीमंतांचा एक वर्ग तयार झाला. पण पैसा हाच वर्ग खेचत असल्याचे समोर येत आहे. श्रीमंतांनी या दोन वर्षांत अशी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याचे आकडेवारी सांगते. कोणत्या राज्यात किती आहेत श्रीमंत.
नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : देशात महागाईने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. सामान्यांना जादा दाम मोजून भाजीपाल्यासह अन्नधान्य खरेदी करावे लागत आहे. चाकरमान्यांना तर जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पण दुसरीकडे देशात कोट्याधीशांची (Crorepati) संख्या पण वाढत आहे. वार्षिक एक कोटींपेक्षा अधिकची कमाई करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या दोन वर्षांत वाढली आहे. मार्च 2022 पर्यंत ही संख्या दुप्पटीने वाढली आहे. हा आकडा 1.69 लाखांवर पोहचला आहे. मुल्यांकन वर्ष 2022-23 च्या टॅक्स रिटर्नच्या आकड्यांनुसार, एकूण 1,69,890 लोकांनी त्यांची वार्षिक कमाई एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी ही संख्या 1,14,446 इतकी होती.
श्रीमंतांची कोटीच्या कोटी उड्डाणे
मुल्यांकन वर्ष 2020-21 मध्ये 81,653 व्यक्तींनी त्यांचे उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. मुल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये 2.69 लाख घटकांनी त्यांची कमाई एक कोटींपेक्षा अधिक असल्याचे दाखवले. या घटकांमध्ये व्यक्तिगत करदाते, कंपनी, फर्म आणि इतर संस्थांचा समावेश होता. मुल्यांकन वर्ष 2022-23 मधील आयटीआरची संख्या 7.78 कोटी आहे. ही संख्या मुल्यांकन वर्ष 2021-22 आणि 2020-21 मध्ये क्रमश: 7.14 कोटी आणि 7.39 कोटी होती.
सर्वाधिक करोडपती महाराष्ट्रात
सर्वाधिक करोडपती महाराष्ट्र राज्यात आहे. 56,000 कोट्याधीश कुटुंब राज्यात राहतात. त्यानंतर उत्तर प्रदेशाचा क्रमांक लागतो. एका अहवालातील दाव्यानुसार, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात राज्यात त्यानंतर श्रीमंत कुटुंब आहेत. देशात एकूण 4.12 लाख सर्वाधिक श्रीमंत कुटुंब आहेत. एकूण श्रीमंतांमधील 46 टक्के याच पाच राज्यांमध्ये राहतात. हुरून इंडियाने (Hurun India) 2020 मध्ये भारतातील श्रीमंतींचा अहवाल दिला होता.
भारतात एकूण 4.12 लाख करोडपती कुटुंब
- राज्य करोडपतींची संख्या
- महाराष्ट्र 56,000
- उत्तर प्रदेश 36,000
- तमिलनाडू 35,000
- कर्नाटक 33,000
- गुजरात 29,000
- पश्चिम बंगाल 24,000
- राजस्थान 21,000
- आंध्र प्रदेश 20,000
- मध्य प्रदेश 18,000
- तेलंगाणा 18,000
आयकर भरण्यात अग्रेसर
मुल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये आयकर भरण्यात पण महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात 1.98 कोटी आयकर रिटर्न दाखल करण्यात आला. त्यानंतर उत्तर प्रदेश (75.72 लाख), गुजरात (75.62 लाख) आणि राजस्थान (50.88 लाख) यांचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगाल मधील 47.93 लाख, तमिलनाडूमधील 47.91 लाख, कर्नाटकमध्ये 42.82 लाख, आंध्र प्रदेशातील 40.09 लाख आयकर रिटर्न फाईल करण्यात आले.
महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य
भारतातील सर्वात श्रीमंत राज्य अर्थातच महाराष्ट्र आहे. 400 दशलक्ष अमेरिकी डॉलर GSDP सह महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य आहे. या ठिकाणी 45 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. बॉलिवूड, अभिनेता, अभिनेत्री, मोठे उद्योजक, लोकप्रिय व्यक्ती मुंबईत राहतात.