मुंबईचे डब्बेवाले नुसता डब्बा पोहचवत नाहीत तर प्रेम पत्रं, किराणा सामानाची यादी, सॉरी लिहीलेले संदेशही पोहचवतात
मुंबईच्या डब्बेवाल्यासाठी कोविड-19 चा काळ परीक्षा पाहणारा ठरला. शाळा आणि कार्यालये ऑनलाईन झाल्याने कोणाला डब्याची गरज राहीली नाही आता काळाबरोबर तेही बदलणार आहेत.
नोएडा | 24 सप्टेंबर 2023 : मुंबईच्या डब्बेवाल्याचं तंत्र अजब असते. इतकी वर्षे या सेवेत आजपर्यंत एकाच्या घराच्या डबा दुसऱ्याच्या घरी कधी गेलेला नाही किंवा एखाद्याला डबाच न मिळाल्याने उपाशी रहावे लागलेले नाही. त्यामुळेच त्यांना ‘मॅनेजमेंट गुरु’ संबोधले जाते. मात्र मुंबईचे डब्बेवाले केवळ डब्बे पोचवत नाहीत तर भावनांची देवाण-घेवाणही करीत असतात. त्यांच्यामुळे अनेक संसार वाचले आहेत असे तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल परंतू ते खरे आहे.
युपी इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या मॅनेजमेंटवर पवन अगरवाल बोलत होते. ते पुढे म्हणाले की डब्बेवाले केवळ जेवणाचे टीफीन डीलिव्हर करीत नाहीत. तर ते मानवी भावनांचीही देवाण-घेवाण करीत असतात. काही घटनांमध्ये गृहिणींने डब्याच्या आत पतीकरीता लिहिलेलं लव्ह लेटर खुबीने लपवलेले असते. तर कधी झालेलं भाडंण मिटविण्याकरीता ‘सॉरी’ लिहीलेली चिट्टी असते. तर उत्तर म्हणून पतीनेही सॉरी म्हणून लिहीलेली कविता देखील असते. अशा प्रकारे डब्बेवाले अनेक विवाह तुटण्यापासून वाचवले असल्याचे अगरवाल सांगतात.
अन्य एक किस्सा सांगताना ते म्हणाले की एका डॉक्टरांची पत्नी डब्यातून त्यांना किराणा सामानाची यादी पाठवायची. त्या डॉक्टरांनी एकदा त्यांना हा किस्सा सांगताना पत्नी जवळ मोबाईल असतानाही ती हटकून ही यादी लिहून पाटवते. वेळात वेळ काढून एकमेकांना संपर्क साधण्याचा हा त्यांचा लेखी पत्र प्रपंच असायचा असे त्यांनी सांगितले. आमचे कामगार जेवण म्हणून स्वत: जवळ केवळ भाकरी आणि पाणी घेतात. त्यांना जवळ अतिरिक्त वजन नको म्हणून असे अगरवाल यांनी सांगितले.
कोणी उपाशी राहू नये हा प्रयत्न
डब्बेवाले रोज 70-80 किमी प्रवास करतात. एकही डब्बा मिस होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असतो. एक डब्बावाला बाप आणि लेकाला दोघांना डबा पोहचवाचया. एकदा त्या मुलाची आई मुलाचा डबा भरायला विसरली. डब्बेवाल्याच्या हे लक्षात आल्याने त्याने रस्त्यात थोडे अन्न विकत घेऊन त्या मुलाला शाळेत लंचटाईमला जाऊन दिले. केवळ डब्बे पोहचविणे आमचे काम नाही तर कोणी उपाशी राहू नये हाही आमचा प्रयत्न असल्याचे तो म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.
डब्बेवालेही ऑनलाईन होणार
मुंबईच्या डब्बेवाल्यासाठी कोविड-19 चा काळ परीक्षा पाहणारा ठरला. शाळा आणि कार्यालये ऑनलाईन झाल्याने कोणाला डब्याची गरज राहीली नाही. जर लोक ऑफीसलाच गेले नाहीत तर डब्बा कोणाला पोहचविणार ? आता तर महिला देखील ऑफीसला जातात. 132 वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरु झाला तेव्हा असे नव्हते. म्हणून आम्ही डब्बेवाल्यांच्या मिसेसनाही या व्यवसायात उतरविले आहे. पती-पत्नी दोन्ही नोकरीवर असल्यास त्या जेवण बनवून डबा तयार करतील. मग त्यांचे नवरे हे डब्बे डिलीव्हर करतील अशी पाच हजार महिलांची भरती केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील डब्बेवाले ही आता आपला व्यवसायात काळाप्रमाणे बदल करणार आहेत. आता आम्ही आमची ऑनलाईन सेवा सुरु करीत आहोत. मुंबईत सध्या दोन लाख डब्बे डीलिव्हर केले जातात असे अगरवाल यांनी टाईम्सशी बोलताना सांगितले.