नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : टाटा समूहाची एफएमसीजी सेक्टरमधील (FMCG Sector) कंपनी टाटा कंझ्युमर प्रोडेक्टसने मोठी खेळी खेळली आहे. ही कंपनी लवकरच नागपूरचा एक ब्रँड त्यांच्या ताफ्यात दाखल करुन घेऊ शकतो. नागपूरचा हा ब्रँड देशातच नाही तर परदेशात पण लोकप्रिय आहे. भुजिया शेवपासून ते ना ना मिठाईपर्यंत, खास करुन सोनपापडीच्या विविध व्हेरायटी, संत्रा बर्फी, संत्रा सोनपापडीसाठी हा ब्रँड प्रसिद्ध आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, आता या ब्रँडशी टाटा समूहाने बोलणी सुरु केली आहे. टाटा कंझ्युमर (Tata Consumer Products) नागपूरच्या या कंपनीत वाटेकरी होऊ इच्छित आहे. एका वृत्तानुसार, टाटा कंझ्युमर थेट 51 टक्क्यांचा वाटा खरेदी करु शकतो.
हल्दीराममध्ये वाटेकरी
टाटा कंझ्युमर प्रोडक्टस मिठाईसह शेव, भुजिया तयार करणारी रिटेल चेन हल्दीराममध्ये (Haldiram) हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. या चर्चेनुसार टाटा कंझ्युमर हल्दीराममध्ये 51 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करु शकतो.
असा होऊ शकतो करार
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हल्दीरामने हिस्सेदारी विक्रीसाठी करण्यासाठी 10 अब्ज डॉलरच्या कराराची अपेक्षा केली आहे. टाटा कंझ्युमरनुसार हल्दीराम यांनी विक्रीसाठी मोठी बोली लावली आहे. या वृत्तानंतर टाटा कंझ्युमरच्या शेअरमध्ये जोरदार उसळी आली. टाटा कंझ्युमरचा शेअर 2.37 टक्क्यांनी वधारला. हा शेअर
866 रुपयांवर ट्रेडिंग करत होता.
असा स्थिरावला नागपूरमध्ये उद्योग
हल्दीरामची सुरुवात बिकानेरमध्ये झाली. त्याठिकाणी 1937 साली त्यांनी फराळाचे दुकान उघडले. त्यासोबत भुजिया विक्री सुरु केली. त्यातून त्यांनी बाजारात ओळख निर्माण केली. त्यांचे भुजियाचे प्रयोग थांबले नाहीत. वेगवेगळ्या रंगाचे, स्वादाचे भुजिया लोकप्रिय होऊ लागले. त्यांनी अगदी कुरकुरीत, पतले, हलके भुजिया बाजारात आणले. ते लोकप्रिय झाले. त्याची चव अनेकांना आवडली. 1941 पर्यंत हा ब्रँड देशभर पसरला. पुढे स्थायिक होण्यासाठी 1970 मध्ये त्यांनी देशाचे मध्यवर्ती स्थान नागपूरची निवड केली. देशातील दुसरे मोठे स्टोअर 1982 साली दिल्लीत सुरु केले. त्यानंतर देशभर रिटेल चेन उघडली.
जगातील 50 देशांमध्ये पदार्थ
देशातच नाही तर हल्दीरामचे पदार्थ जगातील 50 हून अधिक देशांमध्ये विक्री होत आहे. परदेशातील सुपर मार्केटमध्ये पण हे प्रोडक्ट्स सहज मिळतात. 2019 मध्ये हल्दीरामची वार्षीक कमाई 7,130 कोटी रुपये होती. आता रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा कंझ्युमर थेट 51 टक्क्यांचा वाटा खरेदी करु शकतो.