नीता अंबानी यांचा 500 कोटींचा ‘रत्नहार’, शहाजहान आणि इजिप्तच्या राणीशी खास कनेक्शन, काय आहे इतिहास?
नीता अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नात खास 'पन्ना नेकलेस' परिधान केला होता. त्या रत्नहाराने संपूर्ण जगातील लोकांचे डोळे विस्फारले. हिरव्या पाचूचा हा हार जगातील सर्वात मोठ्या पाचूंपैकी एक असल्याचे म्हटले जाते. अंबानी कुटुंबासाठी पाचू रत्न का महत्वाचे आहे? या नेकलेसची खासियत काय आहे?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. गेल्या चार महिन्यापासून हा लग्न सोहळा सुरु होता. जगभरात या लग्नाची जशी चर्चा सुरु होती त्याचप्रमाणे आणखी एका रत्नहाराची लोकांना उत्सुकता होती. तो रत्नहार म्हणजे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी परिधान केलेला 500 कोटींचा पाचू रत्नहार… त्यांच्या या रत्नहाराच्या चकाकीने संपूर्ण जगाच्या लोकांचे डोळे विस्फारले. नीता अंबानी यांनी लग्नात जो पाचूचा हार घातला त्यातील सर्वात मध्यभागी असलेला पाचू हा जगातील सर्वात मोठ्या पाचूंपैकी एक असल्याचे म्हटले जाते. काय आहे या नेकलेसची खासियत? त्याचे मुघल बादशहा शहाजहान आणि इजिप्तच्या राणी यांचे काय आहे खास कनेक्शन? काय आहे त्याचा इतिहास? हे जाणून घेऊ…
भारतामध्ये रशिया, अफगाणिस्तान, युटोपिया, झांबिया, कोलंबिया, पाकिस्तान येथून पाचू येतात. मात्र, पाकिस्तानचे पाचू प्रसिद्ध आहेत. तर, अफगाणिस्तानमधून येणारे पाचू हे अतिशय उत्तम दर्जाचे मानले जातात. जमिनीतून पाचू बाहेर काढल्यानंतर त्याचे चांगल्या पद्धतीने तुकडे केले जातात. यानंतर मशिनच्या मदतीने त्यावरील काळे डाग काढले जातात. पाचू रत्न तयार होण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. भारतामध्ये जयपूर हे पाचूसाठी बनविण्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. येथे पाचूवर कोरीव काम केले जाते. जयपूरमध्ये पाचू कोरणारे जगातील सर्वोत्तम कारागीर आहेत. पाचूचा जितका आकार मोठा तितकी त्याची किंमत जास्त असते. विशेष म्हणजे ही किंमत पाचूची नाही तर त्याचा दर्जा आणि आकारमान यानुसार ठरवली जाते.
भारतात पाचू पहिल्यांदा कधी आला?
330 ईसापूर्व काळात इजिप्तमध्ये खाणकाम करताना पाचू (पन्ना, एमराल्ड) प्रथम सापडला. इजिप्तमध्ये पाचूच्या अनेक खाणी होत्या. इजिप्तची राणी क्लियोपेट्रा हिच्याकडे त्या खाणींची मालकी होती. तिच्याकडे अनेक दुर्मिळ पाचू रत्न होते. इजिप्शियन लोक पाचूचा वापर दागिन्यात करत. तर, एखाद्या राजाच्या मृत्यूनंतर त्याचे दफन केले जात असे. त्यावेळी राजाच्या मृतदेहाजवळ एक पाचू रत्न ठेवले जात असे. पाचू रत्न राजाच्या देहाचे संरक्षण करतो असा त्यांचा समज होता. कोलंबियाच्या पर्वतरांगांमध्येही मौल्यवान पाचू रत्नाच्या खाणी होत्या. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर या खाणी स्पॅनिश लोकांनी शोधून काढल्या. 16 व्या शतकात पाचू रत्न इजिप्तमधून भारतात येत असे. त्यानंतर कोलंबियामधून अवघड मार्गाने भारतात पन्ना आयात करण्यात येत होता.
मुघल सम्राट शहाजहान याचे पाचूवर विशेष प्रेम…
शेकडो वर्षांपूर्वी राजे महाराजे यांच्या काळात पाचू रत्न हे स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरले जात होते. भारतात अनेक राजे, महाराज आपल्या दागिन्यांच्या संग्रहामध्ये पाचू ठेवत असत. मुघलांसाठी मात्र पाचू खूप खास होते. मुघल बादशहा शहाजहान याच्याकडे पाचूंचा दुर्मिळ संग्रह होता. शाहजहान याला पाचू रत्न खूप आवडत होते. मुघल दरबारात पाचू (पन्ना) प्रचंड लोकप्रिय होते. पाचूच्या अपारदर्शकतेमुळे मुगल सम्राट त्याला “चंद्राचे अश्रू” असे म्हणत. हिरे आणि पाचू याबरोबरच मोठमोठे स्पिनल मणी हे ही त्यांचे आवडते होते. ही रत्ने त्यांच्या साम्राज्याच्या ऐश्वर्याचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक होते. त्याचप्रमाणे संरक्षक ताईत म्हणून देखील या रत्नांचा वापर करत. इतिहासकारांनुसार मुघल सम्राट शाहजहान याची लाडकी पत्नी मुमताज महल हिचा मृत्यू झाला. त्यावेळी शाहजहान अनेक दिवस रडत होता. मात्र, रडून रडून त्याचे डोळे लाल झाले होते. थकलेल्या डोळ्यांना शांत करण्यासाठी त्याने पाचू वापरला होता, असे म्हटले जाते.
जहांगीरने पाचू रत्नावर शिलालेख कोरला
भारतीय इतिहासातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे ‘ताजमहाल एमराल्ड’. साधारण 1630-1650 षटकोनी कापलेला हा पाचू अंदाजे 141.13 कॅरेट वजनाचा होता. क्रायसॅन्थेमम, कमळ आणि मुघल खसखस फुलांनी तो कोरलेला आहे. 1925 च्या पॅरिस प्रदर्शनामध्ये ‘ताजमहाल एमराल्ड’ हे तीन मोठ्या मुघल पन्नापैकी एक होते. तर, ‘द मोगल मुगल’ म्हणून ओळखला जाणारा आयताकृती पन्ना हा 217.80 कॅरेट वजनाचा होता. 17 व्या शतकातील रत्नजडित चष्मा ज्यात काचेऐवजी हिरा आणि पन्नापासून बनवलेल्या लेन्स आहेत. हा चष्मा मूळतः मुघल साम्राज्यातील राजघराण्यांचा होता. “गेट ऑफ पॅराडाईज” असे नाव असलेल्या या हिरव्या लेन्सचे चष्मे 300 कॅरेटपेक्षा जास्त वजनाच्या कोलंबियन पन्नापासून तयार करण्यात आले होते. तर, मुघल सम्राट जहांगीर याने एका मोठ्या पाचू रत्नावर शिलालेख कोरला आहे. हा शिलालेख आजही दोहा येथील एका संग्रहालयात आहे. ‘जहांगीर शाह-ए-अकबर शाह’ असे त्यावर लिहिले आहे.
पारंपारिक आणि ट्रेंडी पाचूची मागणी वाढली
1912 च्या सुरुवातीला पाचूच्या दागिन्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढला. ग्वाल्हेरच्या महाराणी सिंदिया यांनी एक खास हार बनवला होता. ज्यामध्ये 9 मोठे मोती, एक माणिक, हिरे आणि नीलम रत्न होते. मात्र, या हाराचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यामध्ये खास 5 मोठे पाचू रत्न बसविली होती. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांनाही पन्नाची विशेष आवड होती. तिच्या दागिन्यांच्या संग्रहात पाचूचा नेकलेस, कानातले, अनेक अंगठ्या आणि ब्रेसलेटचा समावेश होता. पद्मावत चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण हिने घातलेला पाचूचा हारही खूप प्रसिद्धीस आला होता. हा नेकलेस जयपूरमध्ये बनवण्यात आला होता. त्याची किंमत सुमारे एक कोटी आहे.
पाचूची खासियत काय?
पाचू रत्नचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा वाणी, व्यवसाय याचा अधिपती आहे. हिरवा रंग, तेज, शीतलता ही पाचूची वैशिष्टे आहेत. पाचुला पन्ना, आस्मगर्भ, बुधरत्न, हिरनमणी असेही म्हणतात. पाचू रत्न परिधान केल्यास लक्ष्मीची कृपा कायम राहते असे मानले जाते. पाचू रत्न निष्ठा, नवीन सुरुवात, शांतता आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार पाचू धारण केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते. व्यवसायासाठी पाचू घालणे शुभ मानले जाते. परंतु, पाचू प्रत्येकासाठी चांगला असेलच असे नाही. त्यामुळेच बहुतेक लोक पाचू घालण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेतात. हे रत्न धारण केल्याने मनातील विकृती आणि विकार नाहीसे होतात. बुद्धी तीक्ष्ण होते, घर धनाने भरलेले असते. नेपोलियन बोनापार्ट याच्या बोटामध्ये एक मोठ्या पाचू रत्नाची अंगठी होती. या रत्नाच्या दैवी शक्तीमुळे आपल्याला मोठे मोठे विजय प्राप्त झाले अशी त्याची धारणा होती. त्याच्या बुद्धिचातुर्याचे आणि विजयाचे श्रेय तो या पाचुच्या अंगठीला देत असे.
पाचू रत्न धारण करण्याची पद्धत
जन्मकुंडलीमध्ये बुध 2 ऱ्या, 3 ऱ्या, 4 व्या, 7 व्या, 9 व्या, 10 व्या किंवा 11 व्या घराचा स्वामी असेल आणि 6 व्या घरात असेल तर पाचू रत्न धारण केल्याने सर्व त्रास दूर होतात. जन्म पत्रिकेनुसार बुध ग्रहावर शुक्राची दृष्टी असेल, बुध ग्रहाच्या व्यक्तीची महादशा / अंतर्दशा चालू असेल, तसेच मिथून लग्नाच्या लोकांनी पाचू वापरल्यास उत्कृष्ट लाभदायक ठरते. पाचू धारण करण्यापूर्वी त्याला दुधामध्ये धुवून नंतर लहान भांड्यात ठेवावा. यानंतर कुलदैवत आणि भगवान गणेशाच्या मंत्राचा 108 वेळा जप करून बुधवारी सकाळी 10 वाजण्यापूर्वी उजव्या हाताच्या करंगळीत पाचू रत्न धारण करावे. पाचू हा स्वच्छ आणि दोषरहित गडद हिरव्या रंगाचा असावा. यात काळा किंवा पांढरा ठिपका नसावा, उत्कृष्ट पाचुचा स्पर्श हाताला कोमल जाणवतो.