Demonetization : 500,1000 रुपये झटक्यात झाले होते कागद, या देशाने पण केली होती नोटबंदी
Demonetization : भारतात मोदी सरकारच्या काळातील नोटबंदी आणि नोट माघार गाजली. नोटबंदीने तर देशात हजारो लोकांना कामधंदा सोडून बँकेच्या समोर तासन तास उभे केले होते. आजच्या दिवशी या देशात पण नोटबंदी झाली होती. नोटबंदीचा इतिहास केवळ भारतापूरताच मर्यादीत नाहीत.
नवी दिल्ली : वर्ष 2016, 8 नोव्हेंबर, रात्री 8 वाजेची घोषणा भारतातील या काळातील कोणतीही पिढी विसरु शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटबंदीची घोषणा केली. रात्री 12 वाजेनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद (Demonetization) झाल्या. त्यानंतर काही दिवसातच नोटांची रद्दी झाली. लाखो नागरिकांना कामधंदा सोडून रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे ही नोटबंदी प्रत्येकाच्या कायम आठवणीत आहे. तर आता मे महिन्यात 23 तारखेपासून 2000 रुपयांची गुलाबी नोट माघारी बोलविण्यात आली. पण केवळ भारतातच नोटबंदी झाली असे नाही. जगातील अनेक देशात नोटबंदीचा कार्यक्रम गाजला आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या देशांना पण नोटबंदी करावी लागली आहे. त्याकाळात झटक्यात मोठ्या मुल्याच्या नोटा रद्दी झाल्या होत्या.
या देशात नोटबंदी आज, म्हणजे 14 जुलै रोजी अमेरिकेत नोटबंदी झाली होती. या दरम्यान अमेरिकेत भारताप्रमाणेच 500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या नोटांवर बंद घालण्यात आली होती. पण येथील नोटबंदीचे कारण वेगळे होते. काय बरं कारण होतं, इथल्या नोटबंदीमागे..
500, 1000, 5000 आणि 10,000 डॉलरच्या नोट बंद अमेरिकेत आजच्या दिवशी, 14 जुलै, 1969 रोजी अर्थ सचिवालय आणि केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने नोटबंदीची घोषणा केली होती. तात्काळ अमेरिकन अर्थ सचिवालयाने 500, 1000, 5000 आणि 10,000 डॉलर नोटांचा वापर आणि व्यवहार थांबवला होता. या नोटाबंदीमागचे कारण ही तसे विचित्र होते. या नोटांचा वापर कमी झाल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते.
सर्वसामान्य नागरिकांना नव्हते सोयरसूतक या नोटबंदीचा समाजावर मोठा परिणाम झाला नाही. फेडरल रिझर्व्ह बँकेचे खजिनदार, गव्हर्नर यांच्या परवानगीनेच या नोटा बाजारात येत होत्या. एक गोल्ड ब्रिकच्या मुल्यात या नोटा देण्यात येत असत. या नोटा केवळ रिझर्व्ह बँक आणि इतर बँकांदरम्यान व्यवहारासाठी वापरण्यात येत होत्या. सर्वसामान्य नागरिकांना या नोटबंदीचे काहीच सोयरसूतक नव्हते. इलेक्ट्रॉनिक्स सिस्टममुळे अमेरिकेत तेव्हा नोटांचा वापर कमी झाला होता.
या नोटा झाल्या होत्या बाद पण अनेक जणांना वाटते 2016 साली पहिल्यांदाच नोटबंदी झाली. पण तसे नाही. देशात नोटबंदीची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी झालेल्या नोटबंदीत 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. दहा हजार, पाच हजारांच्या नोटा चलनात होत्या हे बऱ्याच जणांना माहितीच नाही.
10,000 रुपयांची नोट दोनदा बंद भारतीय रिझर्व्ह बँकच्या संकेतस्थळानुसार, आरबीआयने पहिल्यांदा 1938 मध्ये 10,000 रुपयांची नोट छापली होती. भारतीय चलनात ही सर्वात मूल्य असलेली नोट होती. पण जानेवारी 1946 मध्ये ही नोट बंद करण्यात आली. 1954 मध्ये 10,000 रुपयांची नोट चलनात आली. पण 1978 मध्ये ही नोट पुन्हा बंद करण्यात आली.
या नोटा चलनातून आऊट आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी 1946 मध्ये पहिल्यांदा 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा जानेवरी 1978 मध्ये पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.