आता मोबाईलच्या जागी नाही येणार साबण किंवा दगड, ऑनलाईन शॉपिंगपूर्वी निवडा हा पर्याय
आता ऑनलाईन शॉपिंग करताना नेहमीच सावधान रहावे लागते. बऱ्याचदा बॉक्स उडल्यानंतर त्यात मोबाईल फोन ऐवजी साबण किंवा दगड मिळाल्याचे प्रकार घडले आहेत. आता त्यावर नवा पर्याय आला आहे.
मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : हल्ली ऑनलाईन शॉपिंगचे फॅड खूपच वाढले आहे. परंतू अनेकदा ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाल्याचे प्रकार अधूनमधून उघडकीस येत असतात. विषेशत: ऑनलाईन मोबाईल फोन मागविताना काहीवेळा बॉक्समध्ये दगड किंवा साबणाची वडी मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे प्रकार स्थानिक डीलिव्हरी करताना होत असतात. आता फ्लिपकार्ट ( Flipkart ) ऑनलाईन विक्रेता कंपनीने असे प्रकार रोखण्यासाठी नवीन पर्याय आणला आहे. या नवीन पर्यायाला ‘ओपन बॉक्स डिलीव्हरी’ म्हटले जाते. या नव्या पद्धतीत डिलिव्हरी एजंट तुमच्यासमोर पॅकेज खोलून आतील वस्तू दाखविणार आहे. जर तुम्हाला योग्य वस्तू वाटली नाही तर तुम्ही ती परत करू शकणार आहे.
ओपन बॉक्स डिलिव्हरी कशी असते ?
जेव्हा आपण फ्लिपकार्टवरुन कोणतीही वस्तू ऑर्डर करणार असाल तर ‘ओपन बॉक्स डिलीव्हरी’ ऑप्शनची निवड करू शकणार आहात. जर तुम्ही हा पर्याय निवडला तर डिलिव्हरी एजंट आपल्या घरी सामान घेऊन येईल आणि आपल्या समोर ती वस्तू बॉक्स उघडून दाखवेल. आपण मागवलेल्या प्रमाणे ती वस्तू असल्याचे पाहून तुम्ही ती स्वीकारू शकता अन्यथा ती वस्तू परत करू शकता. त्यामुळे आपण मागवलेल्या वस्तू पेक्षा दुसरीच वस्तू मिळण्याचा धोका टळणार आहे.
ओपन बॉक्स डिलिव्हरीचे फायदे
– या पद्धतीमुळे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार बंद होतील
– आपल्याला योग्य वस्तू मिळण्याची गॅरंटी मिळणार आहे.
– जर तुम्हाला वस्तू योग्य वाटली नाही तर तिला पुन्हा परत करण्याचा सोय असणार आहे.
ओपन बॉक्स डिलिव्हरी कशी निवडाल ?
जेव्हा तुम्ही फ्लिकार्टवरून एखादी ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यासाठी ऑर्डर नोंदवाल तेव्हा पेमेंटच्या पेजवर ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’ चा पर्याय दिसेल. या पर्यायाची निवड केल्यास तुम्हाला या पर्यायाची निवड करण्याचा वेगळा चार्ज भरावा लागेल. फ्लिपकार्टचा ओपन बॉक्स डिलिव्हरी एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुमची फसवणूकीपासून सुटका होणार आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टवरुन कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेणार असाल तर निर्धोकपणे वस्तू मिळण्यासाठी या पर्यायाचा वापर करु शकता.