Edible Oil : ऐन लग्नसराईत, खाद्यतेलाची स्वस्ताई! नागरिकांची आताच दिवाळी
Edible Oil : ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव वाढला असला तरी खाद्यतेलाने मात्र आनंदवार्ता आणली आहे. नागरिकांना आता उन्हाळ्यातच दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे.
नवी दिल्ली : येत्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिकांना अजून मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या (Edible Oil Price) आघाडीवर आनंदी आनंद गडेचे वातावरण आहे. येत्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किंमतीत 6 टक्क्यांची घसरण दिसू शकते. खाद्यतेल कंपन्यांनी केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर खाद्यतेलाच्या किंमती 6 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक मार्केटमध्ये वायदे बाजारात (Commodity Market) सध्या किंमतीत घसरण सुरु आहे. त्याचा फायदा स्थानिक बाजारात दिसून येत आहे. भावात घसरण होत असल्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी केंद्र सरकारने किंमतीत बदलाच्या सूचना केल्या होत्या.
किंमतीत होईल इतकी घसरण फॉर्च्युन ब्रँडचे मालक अदानी विल्मर तसेच जेमिनी ब्रँडचे मालक जेमिनी एडिबल आणि फॅट्स इंडिया यांनी खाद्यतेलाच्या किंमतीत क्रमशः 5 रुपये प्रति लिटर आणि 10 रुपये प्रति लिटर कपातीचा निर्णय घेतला आहे. या कपातीचा फायदा येत्या तीन आठवड्यात ग्राहकांना मिळेल.
पामतेल स्वस्त एसईएने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यात, विशेष करुन गेल्या 60 दिवसांत आंतरराष्ट्रीय किंमतीत कच्चे पामतेलाचे भाव घसरले आहेत. सोयाबीन, शेंगदाणे आणि मोहरीचे बंपर उत्पादन झाले आहे. पण देशात कच्चा तेलाच्या किंमती आटोक्यात येत नव्हत्या. त्यामुळे केंद्र सरकारने खाद्य तेल उत्पादन कंपन्यांना भावात कपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सध्या काय आहे भाव ग्राहक मंत्रालयानुसार, सध्या देशात 2 मे रोजी शेंगदाणा तेलाचा भाव 189.95 रुपये प्रति लिटर, मोहरीचे तेल 151.26 रुपये प्रति लिटर, सोयाबीन तेलाचा भाव 137.38 रुपये प्रति लिटर, सूर्यफुल तेलाचे भाव 145.12 रुपये प्रति लिटर आहे. येत्या तीन आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमती अजून घसरतील. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
22 टक्के आयात वाढली बाजारातील सूत्रांनुसार, गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात 57,95,728 टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. तर यंदा मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात खाद्य तेल आयातीत 22 टक्के वाढ झाली. देशात 70,60,193 टन आयात करण्यात आले. तर खाद्यतेलाची 24 लाख टनाची खेप अद्याप भारतीय किनारपट्टीला येऊन धडकलेली नाही. त्यानंतर किंमती अजून घसरण्याची शक्यता आहे.
शुल्क मुक्त आयात धोरणाचा देशातील तेल उत्पादन आणि तेलबियांच्या भावांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे देशी बाजारापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांकडील सोयाबीन, मोहरी, शेंगदाणे, कपाशी यांची योग्य भावाने, किमान आधारभूत किंमतींवर जर विक्री झाली नाही तर शेतकरी तेलबियांच्या उत्पादनाकडे पाठ फिरवतील आणि भविष्यात मोठे संकट उभे ठाकेल, अशी भीती व्यक्त होत आहे.