ऑनलाईन गेम महागणार, 1 ऑक्टोबरपासून भरावा लागणार इतका जीएसटी
ऑनलाईन गेम, अश्वशर्यती आणि कसिनो यांना जीएसटी कराच्या घेऱ्यात आणण्यात आले असून 1 ऑक्टोबर पासून त्यावर जादा जीएसटी कर भरावा लागणार आहे. पाहा किती कर भरावा लागणार
नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : भारतात ऑनलाईन गेम खेळणे महाग होणार आहे. कारण ऑनलाईन गेमिंगवर येत्या 1 ऑक्टोबरपासून 28 टक्के वस्तू आणि सेवा कर ( GST ) लागू होणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस एंड कस्टम्स ( CBIC ) चे चेअरमन संजय अग्रवाल यांनी सांगितले की गेमिंग कंपन्यांना यासाठी प्रक्रीयेंतर्गत लिगल नोटीस देण्यात आली आहे. सर्व राज्यातील विधीमंडळांनी जीएसटी संशोधन विधेयक 2023 मंजूर करावे किंवा अध्यादेश आणून एक ऑक्टोबर पासून ते लागू करावे असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.
जीएसटी काऊन्सिलने जुलैमध्ये ऑनलाईन गेम, अश्व शर्यती आणि कॅसिनोवर 28 टक्के जीएसटी लावण्याची घोषणा केली होती. 2 ऑगस्ट रोजी 51 व्या बैठकीत यासेवांवर जीएसटी लावण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी सांगितले की आम्ही सर्व राज्यांच्या सहमतीने एक ऑक्टोबर पासून ऑनलाईन गेमवर 28 टक्के जीएसटी कर लागू करण्यासाठी तयार आहे. ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी कराचा कायदा राज्यातील विधानसभेत मंजूर करावा लागेल. काही ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देणे हा प्रक्रीयेचा भाग आहे.
सर्व राज्यांना जीएसटी कायद्यात सुधारणा करावी
अलिकडेच ऑनलाईन गेम कंपन्यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसी नियमानूसारच असल्याचे संजय अग्रवाल यांनी सांगितले . त्यांनी नेमक्या किती कोटीच्या करासाठी या नोटीसी बजावल्या आहेत, त्याची रक्कम सांगण्यास मनाई केली. परंतू एका अंदाजानूसार सुमारे 1 लाख कोटी रुपयांसाठी ही नोटीस असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन गेम, कसिनो आणि अश्वशर्यतीसाठी जीएसटी कायद्यात आवश्यक नियम बदल करण्यासाठी सर्व राज्यांना आपल्या विधानसभेत आवश्यक सुधारीत विधेयक मंजूर करणे बाकी आहे. हा निर्णय लागू करण्यासाठी हे बदल राज्यांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.