सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाहन उद्योगाला ‘ब्रेक’; ठोक विक्रीत 8 टक्क्यांनी घट
वाहन निर्मितीसाठी मुलभूत मानल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरच्या (semiconductor) तुटवड्यामुळं वाहन पुरवठ्यात घट झाली आहे. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना ‘सियाम’ने जानेवारी महिन्यात वाहनांच्या पुरवठ्यात आठ टक्के घट झाल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली– कोविड प्रकोपामुळं भारतीय वाहन उद्योगाच्या वाढीला ब्रेक बसला होता. कोविड आलेख घसरल्यानंतर ट्रॅकवर येणारा वाहन उद्योगासमोर नवी समस्या उभी ठाकली आहे. वाहन निर्मितीसाठी मुलभूत मानल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरच्या (semiconductor) तुटवड्यामुळं वाहन पुरवठ्यात घट झाली आहे. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना ‘सियाम’ने जानेवारी महिन्यात वाहनांच्या पुरवठ्यात आठ टक्के घट झाल्याचं म्हटलं आहे. जानेवारी 2022 मध्ये एकूण वाहनांची ठोक विक्री 2,54,287 झाली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात वाहन विक्रीचा आकडा 2,76,554 होता. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (SIAM) आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यांत 1,26,693 प्रवासी कारच्या (Passenger vehicle) पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत पुरवठ्याचा आकडा 1,53,244 होता.
सेमीकंडक्टर तुटवडा आकड्यांत:
• यूटिलिटी वाहनांची विक्री जानेवारी 2021 मध्ये 1,11,494 होती. जानेवारी 2022मध्ये 1,16,962 वर आकडा पोहोचला. • दुचाकी वाहनांचा पुरवठा 21 टक्क्यांनी घसरुन 11,28,293 वर • तीन चाकी वाहनांची ठोक विक्री घटीसह 24,091 वर. • मारुति सुझुकी पुरवठ्यात दहा हजारांच्या घटीसह 1,28,924 वर. • हुंदाई मोटर इंडियाच्या पुरवठ्यात आठ हजारांच्या घटीसह 52,005 वर.
‘सेमी’तुटवड्याचा ‘लार्ज’ इफेक्ट:
सेमीकंडक्टरचा तुटवडा संपूर्ण जगाला भेडसावतो आहे. मोठमोठे प्रकल्प सेमीकंडक्टर वेळेवर मिळत नसल्याने थंडावले आहेत. विविध निर्मिती कंपन्यांची पानं सेमीकंडक्टर शिवाय हलत नाही. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. भारताला भविष्यातील सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. वेदांत ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांची कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. या भरीव गुंतवणुकीमुळे देशातील सेमीकंडक्टर उत्पादन वाढणार तर आहेत. त्याचा जागतिक बाजाराला सुद्धा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
सेमीकंडक्टर हब:
देशाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे जागतिक महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेसह केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उपकरणांशी संलग्न ७६,००० कोटींच्या प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मान्यता दिली होती. आगामी सहा वर्षांच्या काळात सेमी कंडक्टर निर्मिती कंपन्यांना टप्प्याटप्प्याने हा निधी देण्यात येणार आहे. यामुळे देशांतर्गत सेमीकंडक्टर निर्मितीला चालना मिळण्यासह, चीनवरील अवलंबित्व कमी होणार आहे.