Chand Bihari : कधी विकले पकोडे तर कधी विकली साडी, आज आहे देशातील मोठे हिरे व्यापारी
Chand Bihari : कधी काळी रस्त्यावर पकोडे विक्री केले, तर कधी साडी विकली, देशातील या मोठ्या सराफा व्यापाऱ्याची अशी आहे कहाणी
नवी दिल्ली : चांदी बिहारी अग्रवाल (Chand Bihari Agrawal) यांची यशोगाथा, बॉलिवूड सिनेमाच्या पटकथेसारखीच आहे. कधी त्यांनी जयपूरच्या फुटपाथवर पकोडे विक्री केले. तर कधी साडी विक्री केल्या. आज बिहारमधील पटना सराफा बाजारातच नाही तर भारतात त्यांचे नाव आहे. त्यांच्या ज्वेलरी (Jewellery) शोरुमची वार्षिक उलाढाल 20 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांनी अनंत अडचणींचा सामाना केला. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी आयुष्य काढले. पण ना कामाची लाज बाळगली ना मेहनत सोडली. त्याच बळावर आज ते अनेकांचे आयकॉन ठरले आहेत.
अनुभवाच्या शाळेत शिकले चांद बिहारी यांचा जन्म जयपूर शहरात झाला. त्यांच्या वडिलांना जुगाराचे व्यसन असल्याने घरात आर्थिक तंगी होती. कमी वयातच त्यांच्यावर काम करण्याची वेळ आली. त्यांना शाळेत शिकता आले नाही. घराला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना वयाच्या 10 व्या वर्षीच रस्त्यावर पकोडे विक्री करावी लागली. त्यातून त्यांच्या कुटुंबाला हातभार लागला. त्यानंतर त्यांनी साड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम केले. त्यामोबदल्यात त्यांना अवघे 300 रुपये वेतन मिळत असे.
12 ते 14 तास काम वय कमी, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना 12 ते 14 तास काम करावे लागत होते. रोजचा घर खर्च भागवायचा तर त्यांना इतके तास काम केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे घरात कमाई येत होती. दोन भाऊ आणि आईच्या मदतीने त्यांनी पकोडे विक्रीचा व्यवसाय सुरु केला. थोडं मोठं झाल्यावर त्यांनी वेगळं काही तरी करण्याचा निश्चय केला.
राजस्थानी साडी विक्रीतून नफा त्यांनी बिहारची राजधानी पाटण्यात राजस्थानी साडी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यांचा या व्यवसायात जम बसला. त्यांनी पाटण्यातील एक दुकान भाड्याने घेतले. याठिकाणी साड्यांची विक्री वाढला. पण नशीबाला हे सूख काही मानवलं नाही. काही दिवसांनी त्यांच्या साडी विक्री केंद्रात मोठी चोरी झाली. त्यात त्यांची जमापुंजी तर गेलीच पण हजारोंच्या साड्या पण लंपास झाल्या. पण त्यांनी हार मानली नाही. पुन्हा शुन्यातून त्यांनी सुरुवात केली.
सोन्यात चमकले नशीब त्यांचा एक भाव ज्वेलरी बिझनेसमध्ये काम करत होता. चांद बिहारी अग्रवाल यांनी त्यात नशीब आजमावलं. काही दिवसांनी त्यांनी 5,000 रुपये जमवून जेम्स अँड ज्वेलरीची दुकान सुरु केली. या व्यवसायात त्यांचा जम बसला. मग चांद बिहारी अग्रवाल यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी सोने-चांदीचे दुकान सुरु केले. सोने-चांदी व्यवसायात त्यांनी नाव काढलं. कधीकाळी अगदी छोटी असलेली ही सराफा दुकान आज मोठी कंपनी झाली आहे.