Petrol-Diesel crisis : पेट्रोलपंप आता ठराविक वेळेतच सुरू राहणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
देशात इंधनटंचाई निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका हा मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांना बसला आहे. अनेक पेट्रोलपंपांवर पेट्रोल, डिझेलचा खडखडात आहे.
मुंबई : सध्या देशावर इंधन तुटवड्याचे (Fuel shortage) संकट घोंगावत आहे. पेट्रोल, डिझेलचा वेळेत पुरवठा होत नसल्याने अनेक पेट्रोलपंप (Petrol pump) बंद ठेवण्यात आले आहेत. अनेक राज्यात अपुऱ्या पेट्रोल (Petrol), डिझेलच्या पुरवठ्याभावी एका ठराविक वेळेतच विक्री सुरू आहे. बिघडत असलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने यूनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशनची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. हा निर्णय पेट्रोलियम क्षेत्रातील सरकारी आणि खासगी असा दोन्ही कंपन्यांना लागू करण्यात आला आहे. पूर्वी हा नियम केवळ उत्तर पूर्व राज्यांनाच लागू होता. मात्र आता यूनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन देशभरात लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार पेट्रोलपंप विक्रेत्यांना पेट्रोलपंप सुरू आणि बंद करण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करावे लागणार आहे. पेट्रोलपंप चालकांना सरकारच्या वतीने पेट्रोलपंप सुरू आणि बंद करण्याची वेळ देण्यात येईल. आता त्याचवेळेत पेट्रोल पंपचालकांना पेट्रोलपंप सुरू आणि बंद करावे लागणार आहेत.
इंधन पुरवठ्यात 50 टक्क्यांची कपात
मिळत असलेल्या माहितीनुसार खासगी तेल कंपन्यांनी रिटेल पुरवठ्यामध्ये जवळपास 50 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे सध्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. याचा सर्वाधिक फटका हा मध्य प्रदेश आणि राजस्थानला बसला आहे. राज्यातील हजारो पेट्रोलपंप स्टॉक नसल्याने बंद आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून सध्या पेट्रोलपंपाना पुरेशाप्रमाणात पेट्रोल, डिझेलचा पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. हरियाणामध्ये देखील अशीच स्थिती आहे. हरियाणाच्या फरीदाबाद, गुरुग्राममध्ये पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण झाली असून, अनेक पेट्रोलपंपावर पेट्रोलच मिळत नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशसह पंजाब, कर्नाटक आणि हिमाचलमध्ये देखील पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
प्रमुख महानगरातील भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. सलग 28 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 96.72 रुपये आहे, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 89.62 रुपये एवढा आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे, तर डिझेलचा दर 92.76 रुपये एवढा आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.73 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |