नवी दिल्ली : सलग 21व्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर स्थिर (Petrol Diesel Rate Today) असल्याचं दिसून आलंय. आजही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. दिलासादायक बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत घट होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे लवकरच पेट्रोल डिझेलची स्वस्त होतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च तेल 102 डॉलर प्रति बॅरलनं विकलं जातंय. 18 एप्रिल रोजी हीच किंमत 114 डॉलरवर पोहोचली होती. त्यानंतर आता दररोज कच्च तेल स्वस्त होत असल्याची नोंद आकडेवारीतून दिसून आली आहे. भारतात तब्बल 85 टक्के इतक्या कच्च्या तेलाची आयात केली जाते. त्यामुळे भारतासाठी कच्च्या तेलाचे दर कमी होणं, हा मोठा दिलासा मानला जातो आहे. 2012-22 मध्ये भारतानं कच्च्या तेलाच्या किंमतीवर तब्बल 119 अब्ज डॉलर इतका खर्च केला होता. जगात सर्वात जास्त कच्च तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा नंबर लागतो.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर जानेवारीमध्ये वाढण्यास सुरुवात झाली होती. फेब्रुवारीत हा दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या पार गेला होता. मार्च महिन्यात सुरुवातीच्या दिवसात तर 140 डॉलर प्रति बॅरल इतका विक्रमी दर कच्च्या तेलाचा झाला होता.
यानंतर मात्र कच्च्या तेलाच्या किंमती या आवाक्यात येऊ लागल्या होत्या. 102 डॉलर प्रति बॅरल इतकी आता कच्च्या तेलाची किंमत झाली आहे.
दरम्यान, गेल्या 21 दिवसांपासून इंधनाचे दर न वाढल्यानं अल्पसा दिलासा मिळाला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम हा सगळ्याच गोष्टींवर होत असून यामुळे महागाईचा दरही वाढललेलाय. त्यामुळे भाज्या, फळं, खाण्यापिण्याच्या गोष्टी, दळणवळण, असं सगळंच महागलं आहे. मात्र आता कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असल्यानं पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दरही कमी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.