Today Petrol Price : क्रूड ऑईलची घसरण, अनुदानही लाटले, मग पेट्रोल-डिझेल का नाही होत स्वस्त?
Today Petrol Price : आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक दिवसांपासून घसरणीवर असलेल्या क्रूड ऑईलने आज मान उंचावली. भावात थोडी वृद्धी झाली. पण भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याचे नावच घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नवी दिल्ली : आता तुम्ही म्हणाल सर्वच गोष्टी अनुकूल आहेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) कमी होण्याचे नावच घेत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) परदेशातील इंधन विक्रीतून नफा कमाविला आहे. त्यातच मध्ये अनेक दिवस क्रूड ऑईलच्या किंमती (Crude Oil Price) सातत्याने घसरणीवर होत्या. मध्यंतरी केंद्र सरकारने तेल कंपन्यांच्या रडक्या सूराला साद देत, त्यांना प्रचंड अनुदान दिले. तरीही या कंपन्या तोट्याचाच राग आळवत आहेत. यांना आता कोणता बुस्टर डोस दिला तर भारतातील पेट्रोल-डिझेलचा भाव जमिनीवर येईल, असा सवाल जनतेतून विचारल्या जात आहे.
तेल कंपन्यांचे तोट्याचे रडगाणे थांबविण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भरीव अनुदान दिले. इंधन विक्रीतून तोटा झाल्याची ओरड तेल कंपन्या करत होत्या. तोट्याची भरपाई म्हणून या कंपन्यांना केंद्र सरकारने 30 हजार कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले. एकीकडे अनेक दिवसांपासून क्रूड ऑईलच्या किंमतीही आटोक्यात आहेत. मग कंपन्यांना इंधन दर कपात करण्यास काय धाड भरली आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्चा तेलात (Crude Oil Price) घसरण होत होती. आज या घसरणीला किंचित ब्रेक लागला. कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास 2.5 डॉलर प्रति बॅरलची वाढ झाली. मंगळवारी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil Price) 74.54 डॉलर प्रति बॅरल होता. तो आज 77.45 डॉलर प्रति बॅरल झाला. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 81.40 डॉलर प्रति बॅरल होता. हा भाव आज 83.97 डॉलर प्रति बॅरल झाला.
केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.
तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.
तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.
- 10 जून रोजी डब्ल्यूटीआयचा भाव 122.8 डॉलर प्रति बॅरल होते
- 15 ऑगस्ट रोजी डब्ल्यूटीआयचा दर 100.4 डॉलर प्रति बॅरल झाले
- 10 ऑक्टोबर रोजी डब्ल्यूटीआयचा भाव 95.18 डॉलर प्रति बॅरलवर आले
- 26 डिसेंबर रोजी डब्ल्यूटीआयचा दर 80.61 डॉलर प्रति बॅरल झाला
- 23 जानेवारी रोजी डब्ल्यूटीआयचा भाव 77.62 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला
- 3 फेब्रुवारी रोजी डब्ल्यूटीआयची किंमत 73.39 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली
- 7 फेब्रुवारी रोजी डब्ल्यूटीआयची किंमत 74.54 डॉलर प्रति बॅरल होती
- 8 फेब्रुवारी रोजी डब्ल्यूटीआयचा दर 77.45 डॉलर प्रति बॅरल झाला