Petrol-Diesel Price : कच्चे तेल महागले, मकर संक्रांतीच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा कापणार का पतंग, काय आहेत भाव
Petrol-Diesel Price : कच्चा तेल महागल्याने पेट्रोल-डिझेलही महागणार का? काय आहेत आजचे दर
नवी दिल्ली : गेल्या 7 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. पण पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतींनी (Crude Oil Price) नवीन विक्रम केला आहे. अनेक दिवसांपासून किंमती कमी होत्या. पण आता कच्चे तेल महागले आहे. त्याचा भारतीय बाजारावर परिणाम होईल का हे तेल कंपन्यांनी अधिकृतरित्या घोषणा केल्यावर समोर येईल. रविवारी, मकर संक्रांतीच्या दिवशी, 15 जानेवारी 2023 रोजी पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price) कोणताही बदल केला नाही. सध्या क्रूड ऑईलच्या किंमतीत जवळपास 8 टक्क्यांची वाढ झाली आहे.
दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 96.72 रुपये तर डिझेलचे भाव 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. इंधनाच्या दरात 21 मे पासून कोणताही बदल झालेला नाही.
मे महिन्यातच भावात जोरदार वाढ झाल्याने जनतेने संताप व्यक्त केला होता. त्याचा लागलीच परिणाम दिसून आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपये प्रति लिटर तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 6 रुपये प्रति लिटरची कपात केली होती. भाजप शासित राज्यांनीही उत्पादन शुल्कात कपात केली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काही राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला. नवीन वर्षात हिमाचल प्रदेशातील सरकारने 8 जानेवारी रोजी डिझेलवरील व्हॅटमध्ये 3 रुपये प्रति लिटरची वाढ केली. त्याचा परिणाम दिसून आला. डिझेलच्या किंमतीत वाढ झाली.
व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक महापालिका, पालिका, नगर परिषदेचा कर, पंपचालकांचे कमिशन आणि इतर शुल्क जोडल्यानंतर भाव निश्चित केले जातात. प्रत्येक राज्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. त्यात स्थानिक कर जोडल्या जातात. त्यानंतर किंमत ठरते.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या तेल विपणन कंपन्या दररोज भाव निश्चित करतात. आंतरराष्ट्रीय किंमती, डॉलरची किंमत यानुसार किंमती निश्चित होतात. प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता नवीन दर लागू होतात.
तिसऱ्या तिमाहीत कच्चा तेलाचे भाव 110 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. चीन आणि इतर अन्य आशियायी देशात कोविड निर्बंध हटवले तर ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमती 110 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जातील. भारत कच्चे तेल आयात करणारा एक प्रमुख देश आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम किंमतींवर दिसून येईल.