PM Vishwakarma Yojana | माफक व्याजदर, कुशल कारागिरांना मोदी सरकार देणार 3 लाख रुपये
PM Vishwakarma Yojana | कुशल कामगारांना आता त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज मिळेल. कुशल कारागिरांना आर्थिक हातभारासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरु करण्यात आली आहे. 18 व्यावसायातील कुशल कामगारांना योजनेतून कर्ज मिळते. तेही अत्यंत माफक व्याजदरात, जाणून घ्या काय आहे ही योजना...
नवी दिल्ली | 22 February 2024 : तुम्ही एखाद्या कलेत निपूण आहात, कुशल कारागिर आहात आणि व्यवसाय सुरु करायचा आहे, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. व्यवसाय सुरु करायला भांडवल लागतं. अनेकदा इच्छा असूनही पैशा अभावी मोठी झेप घेता येत नाही. अशा कारागिरांसाठी मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यासाठी गेल्या वर्षी विश्वकर्मा जयंती दिनी PM Vishwakarma Yojana सुरु करण्यात आली. एकूण 18 व्यवसायाशी संबंधित कुशल कामगारांना योजनेअंतर्गत विना हमीदार कर्ज सहाय्य करण्यात येते. त्यासाठीचा व्याजदर पण वाजवी आहे. काय आहे ही योजना, अर्ज कसा करणार, जाणून घ्या..
व्यवसायासाठी 3 लाखांचे कर्ज
पीएम विश्वकर्मा योजनेत कुशल कारागिरांना स्वतःच्या व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्याला मोठा आर्थिक हातभार मिळतो. या योजनेत 3 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होते. हे कर्ज दोन टप्प्यात देण्यात येते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय उभारणीसाठी एक लाख रुपये कर्ज देण्यात येते. तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये देण्यात येतात. अर्जदाराला कर्जासाठी हमीदाराची गरज नाही. हे कर्ज 5 टक्के व्याज दरावर उपलब्ध आहे.
प्रशिक्षण पण देणार
या योजनेत केंद्र सरकार तीन लाख रुपयांचे स्वस्त कर्ज देईल. तर दुसरीकडे केंद्र सरकार कारागीरांना त्यांच्या व्यवसायात आणखी निपुण करण्यासाठी तसेच जागतिक कसोट्यांवर उतरण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये तात्पुरते आणि विशेष प्रशिक्षणाचा समावेश आहे. त्यांना 500 रुपयांचा प्रशिक्षण भत्ता पण देण्यात येईल.
या बलुते-अलुतेदारांना कर्ज
रंगकाम करणारे, रंगारी, सुतार, लोहार, नाव, होडी तयार करणारे, कुंभार, मुर्तीकार, मिस्री, मासळी पकडण्यासाठी जाळे विणणारे, टूलकिट उत्पादक, दगडकाम करणारे, चांभार, टोकरी, चटई, झाडू तयार करणारे, खेळणी उत्पादक, परीट आदी व्यावसायीकांचा यामध्ये समावेश आहे.
कर्ज मिळविण्यासाठी पात्रता
- अर्जदार भारतीय नागरीक असावा
- विश्वकर्मा योजनेतील 18 ट्रेडपैकी एकात निपूण असावा
- मान्यता प्राप्त संस्थेचे त्या क्षेत्राशी संबंधित प्रमाणपत्र हवे
- योजनेत सहभागी 140 जातींपैकी एक असावा
या कागदपत्रांची गरज
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- उत्पनाचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- बँकेचे पासबूक
- नोंदणीसाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक
कसा करणार अर्ज
- pmvishwakarma.gov.in वर जाऊन अर्ज करा
- होमपेजवर जाऊन PM Vishwakarma Kaushal Samman Yojana वर क्लिक करा
- आता Apply Online या पर्यायावर क्लिक करा
- योजनेसाठी आता नोंदणी करा
- रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे मिळेल
- त्यानंतर संपूर्ण नोंदणी अर्ज बारकाईने आणि सविस्तर भरा
- तुमची सर्व कागदपत्रे स्कॅन करुन ती अर्जासोबत अपलोड करा